बारसूत रिफायनरी लादल्यास महाराष्ट्र पेटवू-उद्धव ठाकरे

0
uddhav thackeray

रत्नागिरी: सरकारने हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केल्यास ती हुकूमशाही तोडून-मोडून टाकू व आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray in Ratnagiri) यांनी राज्य सरकारला दिला. शनिवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी राजापूरच्या सोलगाव येथील रिफायनरी विरोधक ग्रामस्थांची भेट घेतली. सोलगाव-बारसू रिफायनरीविरोधातील लढ्यात आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. तुम्ही काळजी करु नका. कोकणात लोकांचे मुडदे पाडून मी विकास होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

प्रकल्प होऊ नये

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी मी पत्र दिले होते. पण त्याचा अर्थ याच ठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. लोक भिकारी झाले तरी चालतील, पण रिफायनरी करा, असे मी बोललो होतो का? नाणार प्रकल्पाला आम्ही विरोध केला होता. बारसूमध्येही माणसे राहतात. याठिकाणीही आंबा आणि काजूच्या बागा आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची गद्दार ओळख

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी गद्दार शब्दाचा वापर केला. सध्याच्या मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख आहे, असेही ते म्हणाले.