‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स’ नुसार आनंदाच्या बाबतीत भारतीय अद्यापही माघारलेले

0

नवी दिल्ली : भारतीयांचे जीवनमान सुधारत असले तरी आनंदाच्या बाबतीत भारतीय जगाच्या तुलनेत अद्यापही बरेच माघारले असल्याची स्थिती ‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स’च्या माध्यमातून (World Happiness Index) पुढे आली आहे. जगातील 146 देशांच्या यादीत क्रमवारीत भारत आनंदाच्या बाबतीत 126 व्या क्रमांकावर असून धक्कादायक म्हणजे पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश हे छोटे व गरीब देश आनंदाच्या बाबतीत ‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स’ मध्ये भारतापेक्षासही सरस असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेय.

संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कमार्फत दरवर्षी २० मार्च रोजी ही यादी जाहीर केली जाते. यंदाही ती जाहीर करण्यात आली असून जगाच्या तुलनेत भारतीय फारसे आनंदी नसल्याचे चित्र या अहवालातून उभे झाले आहे.
हॅपिनेस इंडेक्स काढताना वेगवेगळ्या निकषांचा वापर केला जातो. त्यात प्रामुख्याने जीवन गुणवत्ता, सकल घरेलू उत्पादन, आयुर्मान, उदारता, सामाजिक समर्थन, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार या घटकांचा समावेश करून मूल्यानंक काढले जाते. त्याआधारे जगभरातल्या देशांमधल्या परिस्थितीचं मूल्यांकन करून त्यानुसार यादीतील स्थान निश्चित केले जाते. या यादीनुसार जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये गेल्या सहा वर्षांप्रमाणे याही वर्षी फिनलँडने बाजी मारली असून त्यापाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, इस्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वीत्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि न्यूझीलंड या पहिल्या देशांची क्रमवारी आहे. तर दुसरीकडे सर्वात कमी आनंदी देशांमध्ये तालिबान्यांची राजवट असलेला अफगाणिस्तान सर्वात तळाशी आहे. त्याव्यतिरिक्त लेबनॉन, झिम्बाब्वे, कांगो या देशांचा सर्वात कमी आनंदी देशांमध्ये समावेश होतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असताना हे देश आनंदाच्या बाबत अद्यापही वरच्या क्रमांकावर आहेत. यात मागील वर्षीच्या तुलनेत रशियाची क्रमवारी सुधारून रशियाने ८० वे स्थान पटकावले आहे तर युक्रेनची क्रमवारी देखील सुधारून हा देश ९२ व्या क्रमाकांवर आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा