“फाशीच्या शिक्षेला पर्याय सुचवा…” सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

0

नवी दिल्ली: फाशीची शिक्षा योग्य की अयोग्य, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. दोषी गुन्हेगारांना फाशीच्या तुलनेत अन्य कमी वेदनेचा पर्याय देता येईल का, यावर विचार करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. (Death By Hanging) दोषींना वेदनारहित शिक्षा देण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 2 मे रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत फाशीऐवजी अन्य पर्याय काय असू शकतात काय? असा प्रश्न न्यायालयाने केंद्राला केलाय. फाशीच्या तुलनेत अन्य विविध पर्यायांचा विचार करून माहिती संकलित करण्यात यावी, असे न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या विषयावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याचा पर्याय खुला आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेत फाशीऐवजी गोळी मारणे, प्राणघातक इंजेक्शन किंवा इलेक्ट्रिक खुर्ची असे पर्याय सुचविले आहेत. सरन्यायाधीशांनी सांगितले की, ही चिंतनाची बाब आहे. आम्हाला आमच्या हातात काही वैज्ञानिक माहिती हवी आहे. आम्हाला या प्रकरणात अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा. कदाचित आम्ही या संदर्भात एक समिती स्थापन करू, असे संकेत न्यायालयाने दिलेत. सरन्यायाधीश म्हणाले की, प्राणघातक इंजेक्शन देखील वेदनादायक आहे. गोळी मारणे हा मानवी हक्कांचे पूर्णपणे उल्लंघन करून लष्करी राजवटीचा आवडता टाइमपास होता. जर दुसरी पद्धत अवलंबली जाऊ शकत असल्यास फाशी देऊन मृत्यू असंवैधानिक म्हणून घोषित केला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.