कर्तव्यतत्पर रेल्वेमंत्री…

0

 

ओडिसामधील बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताने देश हादरला. या महाभीषण अपघातात तीनशे प्रवासी ठार झाले व एक हजारांहून अधिक जखमी झाले. एकशे अठ्ठावीस किमी वेगाने धावणारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस मेन लाइन सोडून लूप लाइनवर गेली. तेथे उभ्या असलेल्या मालगाडीवर आदळली. त्यानंतर ताशी ११६ किमी वेगाने येणारी बंगळूरु-हावडा सुपरफास्ट ट्रेन रुळावर पडलेल्या डब्यांवर धडकली. तीनही गाड्यांचे डबे एकमेकांवर आदळले व त्यातून हा भीषण अपघात झाला.

भारतीय रेल्वेचे जगात सर्वात मोठे नेटवर्क आहे. रोज तेरा हजार रेल्वे गाड्या देशभर धावत असतात व एक कोटी तीस लाख लोक त्यातून प्रवास करीत असतात. रेल्वेचा अपघात झाला आणि प्रवाशांची मृतांची संख्या जाहीर झाली की, विरोधी पक्षाकडून रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची या देशात अनेक वर्षे परंपरा आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, असे विरोधी पक्ष उदाहरण देत असतात.

मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे उच्चशिक्षित, कार्यक्षम, कर्तव्यतत्पर मंत्री आहेत. त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कारभाराविषयी कधी कोणी वाईट बोलले, असे कधी ऐकायला मिळत नाही. ओडिसामधील महाभयंकर रेल्वे अपघातानंतर ते तत्काळ घटनास्थळी गेलेच पण रेल्वे मार्ग सुरू होईपर्यंत ५१ तास ते जागेवर थांबून होते. अपघातात सापडलेल्यांची सुटका, जखमींवर औषधोपचार, मृतांच्या नातेवाइकांशी संपर्क आणि त्यांना नुकसानभरपाईचे वाटप तसेच अपघातामुळे ठप्प झालेला रेल्वे मार्ग तातडीने सुरू करणे अशा सर्व आघाड्यांवर ते सक्रिय दिसले. नवी दिल्लीच्या रेल भवनमध्ये थांबूनही त्यांना सूचना देता आल्या असत्या, दिल्लीतून मदतीचे आदेश देता आले असते पण प्रत्यक्ष अपघातस्थळी जाऊन व तेथे थांबून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याचे काम त्यांनी केले. अपघातानंतर एकावन्न तासांनंतर पहिली रेल्वे गाडी त्या मार्गावरून निघाली, तेव्हा एक मिशन पूर्ण झाले, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. रेल्वे रुळांच्या बाजूला उभे राहून त्यांनी अपघातानंतर सुटलेल्या पहिल्या गाडीला दोन्ही हात जोडून वंदन केले….

देशातील विरोधी पक्षांनी ओडिसातील महाभयंकर रेल्वे अपघातानंतर त्याचे खापर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर फोडण्याचा चंग बांधला होता. ओडिसातील रेल्वे अपघातानंतर अश्विनी वैष्णव यांचा मंत्रीपदाचा राजीनामा कोण मागत आहेत, तर ते सर्व भाजप विरोधक आहेत. जाती-पातीच्या आधारावर व्होट बँक राजकारण खेळून निवडणुका लढवत आले आहेत, तेच रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यातले काही पुरेसे शिकलेले नाहीत किंवा चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले आहेत. अश्विनी वैष्णव हे बीटेक, सुवर्णपदक विजेते आहेत. आयआयटी कानपूरमधून एमटेक आहेत. आयएसमध्ये देशात २७ वी रँक मिळवली होती. केंद्र सरकारमध्ये उपसचिव, पेनसिल्वानिया विद्यापीठातून एमबीए, अमेरिका, जर्मनीमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केले आहे. मार्मागोवा पोर्ट प्राधिकरणाचे ते चेअरमन होते. रेल्वेबरोबर टेलिकॉम मंत्रालयही ते संभाळत आहेत. ५ जी वेगाने राबविण्यात त्यांचा पुढाकार आहे. वंदे भारतसाठी पुढाकार व रेल्वे स्थानकांचे अाधुनिकीरण यावर त्यांचा भर आहे. बुलेट ट्रेनच्या तांत्रिक बाबींमध्ये स्वत: लक्ष देणारे ते तज्ज्ञ आहेत. अशा सक्षम व्यक्तीला मंत्रीपदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्ष मागणी करतो हीच दुर्दैवाची बाब आहे.

रेल्वे अपघातांचा आजवरचा इतिहास बघितला, तर प्रत्येक अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला असे घडलेले नाही. तामिळनाडूतील अरियालूर येथे १९५६ मध्ये रेल्वे अपघात झाला तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा दिला होता. त्या अपघातात २५० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षात आंध्र प्रदेशमध्ये अगोदर झालेल्या एका रेल्वे अपघातात १०० प्रवाशांची मृत्यू झाला होता, तेव्हाही शास्त्री यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला होता, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो फेटाळून लावला. तामिळनाडूतील रेल्वे अपघातानंतर शास्त्री यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा ते तीन वर्षांनी नेहरूंच्या सरकारमध्ये आले व तेव्हा त्यांच्याकडे उद्योग व वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. एवढेच नव्हे तर १९६१ मध्ये सर्वात महत्त्वाचे गृहखाते पंडित नेहरूंनी शास्त्रीजींकडे सोपवले. पंडित नेहरूंच्या निधानानंतर देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे चालून आली. देशातील जनतेत आणि काँग्रेस पक्षात लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी फार मोठा आदर होता. सन १९९९ मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. रेल्वेमंत्री नितीशकुमार होते. त्या वर्षी पश्चिम बंगालमधील घैसाल येथे दोन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन मोठा उपघात झाला. ब्रह्मपुत्रा मेल ही अवध आसाम एक्स्प्रेसवर आदळून २८५ जण ठार झाले व ३०० जखमी झाले होते. रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडल्यामुळे हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर नितीशकुमार यांनी तत्काळ रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा पाठवून दिला. पंतप्रधान वाजपेयी यांनी त्यांना कोणताही निर्णय घाईने घेऊ नये, असा सल्ला दिला. पण रेल्वेच्या त्या भीषण अपघातानंतर आपल्याला एवढा मोठा धक्का बसलाय की, सांगायला आपल्याकडे शब्द नाहीत, आपल्या निर्णयामागे कोणतेही राजकारण नाही, असा खुलासा नितीशकुमार यांनी केला.

रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार यांच्या राजकीय करिअरमध्ये काहीही फरक पडलेला नाही. एनडीएमध्ये जनता दल युनायटेड हा महत्त्वाचा मित्रपक्ष होता. भाजपने त्यांना नेहमीच सत्तेच्या परिघात असतील याची काळजी घेतली. एकदा रेल्वेमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर पुन्हा रेल भवनात मंत्री म्हणून परतण्याची संधी त्यांना २००२ मध्ये मिळाली.
ममता बॅनर्जीही वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या. त्या रेल्वेमंत्री असताना झालेल्या रेल्वे अपघातात ४३ प्रवासी ठार झाले होते, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. पण वाजपेयींनी तो फेटाळून लावला. सन २०१६ मध्ये सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होते. चार दिवसांत दोन रेल्वे गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातात १५० जण मृत्युमुखी पडले. तेव्हा प्रभू यांनी राजीनामा दिला.ओडिसातील भीषण तिहेरी रेल्वे अपघातानंतर अश्विन वैष्णवी यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव विरोधी पक्षांनी वाढवला असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र वैष्णवी यांना साथ दिली, हे विशेष महत्त्वाचे आहे. आपण रेल्वेमंत्री असताना सुरक्षा उपायांची अंमलबजावणी सुरू केली होती. पण त्याचा विस्तार झाला नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. विशेषत: सुरक्षा कवच सर्वत्र लागू झाले असते, तर रेल्वे अपघातावर नियंत्रण राहिले असते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. अपघातग्रस्त प्रवाशांची सुटका, तातडीने औषधोपचार आणि रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, रेल्वे अपघाताचे राजकारण कोणी करू नये, अशी कळकळीची विनंती रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधी पक्षांना केली.

ममता बॅनर्जी यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या काळात ५४ अपघात झाले, रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना ८३९ घडल्या व १४५१ प्रवासी मृत्युमुखी पडले.

नितीशकुमार यांच्या कारकिर्दीत ७९ रेल्वे अपघात घडले, रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना १००० घडल्या व १५२७ प्रवासी ठार झाले.
लालूप्रसाद यादव यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या काळात ५१ रेल्वे अपघात झाले, ५५० गाड्या रुळावरून घसरल्या व ११५९ जण मृत्युमुखी पडले. भारतात सर्वात मोठा रेल्वे अपघात सन १९८१ मध्ये बिहारमधील सिरसा येथे घडला होता. दोन एक्स्प्रेस ट्रेन एकमेकांवर आदळून ८०० लोक ठार झाले होते. कमलापती त्रिपाठी तेव्हा रेल्वेमंत्री होते, पण त्यांनी राजीनामा दिला नव्हता. गेल्या काही वर्षांत सुपरफास्ट गाड्यांची संख्या वाढत आहे. वंदे भारतचे आकर्षण देशभर आहे. प्रत्येक विभागाला वंदे भारत हवी आहे. बुलेट ट्रेन येणार आहे. ओडिसा रेल्वे अपघाताची सीबीआय, रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा आयुक्त अशा तीन यंत्रणांमार्फत एकाच वेळी चौकशी चालू आहे.

डॉ. सुकृत खांडेकर
[email protected]