२० लाखांचा साठा जप्त : वर्ध्यात मोठी कारवाई
वर्धा. राज्यात सुगंधित तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असला तरी विदर्भात सर्वदूर या तंबाखाची खुलेआम विक्री सुरू आहे. चौकचौकांमध्ये पानठेल्यांवर ऐवढेच कशाला अनेक शासकीय कार्यालयांच्या बाहेरही सुगंधित तंबाखाची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. पोलिस आणि अन्न व औषधी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी त्याचा कोणताही परिणाम विक्रेत्यांवर होताना दिसत नाही. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्थानिक बढे चौकातील प्रिया ट्रेडिंग व मोहता मार्केट मधील दोन दुकानांवर धाडी टाकल्या. येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूचा साठा करून ठेवण्यात आले असल्याचे समोर आले आहे. एकूण वीस लाख रुपये किमतीचा तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तुंबाखूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईत विविध कंपनीचा तंबाखू जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चमू स्थापन केली केली होती. अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात येत असून शालेय विद्यार्थी त्यास बळी पडत असल्याचे चिंताजनक चित्र आहे.
नागभिड पोलिसांनीही पकडला १.३२ लाखाचा साठा
नागभिड पोलिसांनी शहरातील टिपॉईंटजवळ प्रतिबंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करीत १.३२ लाखाचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू जप्त केला. एमएच ३४ सीपी २६२४ क्रमांकाच्या कारमधून हा साठा भंडारा येथून चंद्रपुरात नेला जात होता. याबाबत पोलिसांना गुप्त सुचना मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी करण्यात आली. संबंधित वाहन येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून ही कारवाई केली. सुमारे १.३२ लाख किमतीचे तंबाखाचे डबे, ६ लाखांची कार, ३० हजार किंमतीचे ४ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक महिण्याच्या कालावधीत ठाणेदार पदाची जबाबदारी घेवून योगेश घारे यांनी अनेक वाईट धंद्यांना अंकूश घातले आहे. अवैध जुगार, सट्टा पट्टी, अवैध दारुविक्री, कोंबड बाजार अशा अनेक अवैध धंद्याना पायबंद बसला आहे.