‘विदर्भ महाराष्ट्राचे नवे गुंतवणूक केंद्र’

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे, ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२५ : खासदार औद्योगिक महोत्सवा’चे  (‘Advantage Vidarbha 2025: MP Industrial Festival’)उदघाटन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या महोत्सवामुळे विदर्भाला उद्योगाच्या केंद्रस्थानी आणण्याचे काम होत आहे. विदर्भ हे आता गुंतवणुकीसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे केंद्र बनत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात गुंतवणूक केवळ मुंबई महानगर क्षेत्र व पुणे येथेच मर्यादित होती, पण राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे आता मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ अशा राज्याच्या सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत राज्यात सुमारे ₹१५ लाख ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले, त्यापैकी एकट्या विदर्भात ₹५ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्रातील सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ येथील गुंतवणूक, गडचिरोलीतील अद्ययावत विमानतळ, अमरावती जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्क, आशियातील दुसरी सर्वात मोठी विमान प्रशिक्षक अकादमी याबद्दल सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच येथे गुंतवणूक करणारे उद्योजक हेच या भागाचे खरे विकासदूत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विदर्भात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत, मंत्री आकाश फुंडकर, मंत्री संजय सावकारे, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.