नागपूर (Nagpur):दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसानंतर आज शनिवारी दुपारच्या सुमारास पुन्हा नागपुरात जोरदार पाऊस झाला. काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसात गारा पडल्याची माहिती मिळाली. दोन दिवसात सुमारे पन्नास झाडे पडल्याने वीज तारा ठिकठिकाणी तुटल्या, काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा अजूनही पूर्ववत व्हायचा आहे. दोन दिवसापूर्वीच्या पावसात नागपुरात भिंत कोसळून तर दुसऱ्या घटनेत घरावरील टिन अंगावर पडून अशा प्रकारे चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे वादळी पावसाचा इशारा म्हटल्यानंतर साहजिकच रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसले.
लग्नसराईचे दिवस असल्याने लॉन्स मध्ये असलेल्या लग्न, स्वागत समारंभांना मोठा फटका बसला. शेती,फुले,फळबागांचे सतत नुकसान। होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील तीन चार दिवस नागपूर (Nagpur ), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha) असा पूर्व विदर्भात आकाश ढगाळलेले व वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 42 अंशापार गेलेला विदर्भातील पारा या आठवड्यात सरासरी तीन चार अंशाने खाली घसरला आहे.