राजा कायम, अवकाळी – अतिवृष्टी देणार तडाखा

0

भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर

बुलढाणा. (Buldhana) बहुप्रतीक्षित भेंडवळ येथील घटमांडणीचे (Bhendwal Ghatmandani) अंदाज आज जाहीर करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांचे या घटमांडणी आणि जाहीर होणाऱ्या भाकीताकडे लक्ष लागून असते. या घटमांडणीच्या अंदाजावरूनच शेतकरी वर्षभराचे पीक पाण्याचे नियोजन करतात (Farmers plan for the year). पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन अंदाज वर्तविण्यात आले. यंदा अवकाळी, अतिवृष्टी (heavy rains) तडाखा देत राहील. राजा कायम राहणार असला तरी अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अंदाज ऐकण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

घटमांडणीच्या अंदाजानुसार जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल. जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल. वारंवार अवकाळी पाऊस होणार असून, पिकांचे नुकसान होईल.

यावर्षी पिकांवर रोगराई राहिल. कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल. ज्वारी सर्वसाधारण राहिल
तूर पीक चांगले असेल. मूग पीक सर्वसाधारण असेल. उडीद मोघम सर्वसाधारण असेल. बाजरी आणि तीळही सर्वसाधारण असेल. मात्र, नासाडी होईल. तांदळाचे पीक चांगले येईल. गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल.
हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसानसुद्धा होईल.

शेजारी राष्ट्रांच्या कुरघोड्या

देशाचे संरक्षण मजबूत राहिल. मात्र, शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या कायम राहतील. देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल. राजा कायम असेल. पण, राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल. राजकीय उलथापालथ होत राहिल. नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त असेल.

३५० वर्षांची परंपरा

भेंडवळ येथे दरवर्षी गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया दरम्यान निसर्गाचे सुक्ष्म निरीक्षण केले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घटमांडणी केली जाते. दुसऱ्या दिवशी घटात होणाऱ्या बदलांवरून पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भविष्यवाणी केली जाते. ३५० वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. चंद्रभान महाराज वाघ यांनी घट मांडणी सुरू केली होती. आता त्यांचे वंशज ही परंपरा कायम ठेवून आहेत.