मोगा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण : खलिस्तान समर्थक, ३६ दिवसांपासून सुरू होता शोध
मोगा. कट्टर खलिस्तान समर्थक असणारा ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगने (Amritpal Singh) अखेर रविवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (Surrender) केले. गेल्या ३६ दिवसांपासून तो फरार होता. पोलिस सातत्याने त्याच्या मागावर होते. अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांकडून (Punjab Police) देशभरात विशेष मोहिम राबवण्यात आली होती. अमृतपाल सिंगने स्वत: पंजाब पोलिसांना फोन करून आत्मसमर्पणाची तयारी दर्शविली होती. मोगाच्या रोडा गावातील गुरुद्वाराजवळ रविवारी सकाळी त्याने पोलिसांसमोर शरणांगती पत्करली. अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असताना अमृतसर विमानतळावरून पंजाब पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. दोनच दिवसांपूर्वी ही कारवाई करण्या आली होती. याशिवाय पंबाज पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अमृतपालचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही कसोशिने चौकशी करण्यात येत होती. चारही बाजुने दबाव वाढत असल्याने त्याने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला.
अमृतपाल सिंगचा उजवा हात मानला जाणारा पापलप्रीत सिंग याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. तो अटकेत आल्यापासूनच अमृतपाल सिंगला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अमृतपाल सिंग वर शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप आहेत. सध्या आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला ताब्यात घेतले आहे. त्याला आसामच्या डिब्रुगडमधील तरुंगात पाठवण्यात येणार आहे.
23 फेब्रुवारीला अमृतपाल सिंगने काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलिस स्थानकावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर त्याने काही वृत्तवाहिन्यांना मुलाखतही दिली होती. यात त्याने खलिस्तानची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही धमकी दिली होती. या घटनेपासूनच पोलिस त्याच्या मागावर होते. पण, तो वेश बदलून पसार झाला होता.
कोण आहे अमृतपाल सिंग ?
अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आहे. खलिस्तान या वेगळ्या देशाची त्याची मागणी आहे. तो दुबईहून परतला आहे. ‘वारिस पंजाब दे’ ही संघटना पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने तयार केली आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने संघटनेचा ताबा घेतला. त्याने भारतात येऊन लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. अमृतपाल सिंग आयएसआयशी जोडल्याचा आरोप आहे.