जयपूरः भारतीय वायुसेनेचे आणखी एक मिग-21 हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना राजस्थानमधील हनुमानगड परिसरात घडली असून हे विमान बहलोल नगरातील एका घरावर कोसळल्याने त्यात 3 महिलांचा दुदैवी मृत्यू (MIG-21 Fighter Jet Crash in Hanumangarh) झाला. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली असून विमानाचा वैमानिक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विमानाने सुरतगड तळावरून उड्डाण केले होते, अशी माहिती आहे. २०२१ पासून आतापर्यंत मिग-21 कोसळण्याची सातवी घटना असून कालबाह्य झालेल्या या विमानाला वायुसेनेचे अधिकारी ‘फ्लाईंग कॉफीन’ असे संबोधतात. आगामी दोन-तीन वर्षात ही विमाने वायुसेनेतून निवृत्त करण्याची वायुसेनेची योजना आहे.
वायुसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिक राहुल अरोरा (वय 25) यांनी कोसळणाऱ्या विमानातून स्वतःला इजेक्ट करीत पॅराशूटच्या साह्याने उडी घेतली. ते सुरक्षित असल्याची माहिती असून त्यांना त्वरीत सुरतगडला पाठवण्यात आले आहे. हे विमान घरावर कोसळल्याने त्यात
बाशोकौर रतन सिंग शीख (45), बंटो पलालसिंग राय सिंग (60), लीला देवी राम प्रताप (55) या तीन महिलांचा मृत्यू झाला. मागील १६ महिन्यात मिग कोसळण्याची ही सातवी घटना असून यापूर्वीची ताजी घटना २८ जुलै २०२२ ची असून त्यात मिग-२१ बायसन हे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.