राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध जयंत पाटील संघर्ष?

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वासाठी अजित पवार आणि जयंत पाटील असा संघर्ष सुरु झाला की काय, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदावर शरद पवार असले तरी महाराष्ट्रातील नेतृत्वासाठी अजित पवार आणि जयंत पाटील असा छुपा संघर्ष सुरु (Leadership Conflict in NCP) झाल्याचे संकेत सध्या राष्ट्रवादीच्या मुख्यालयाजवळ सुरु असलेल्या होर्डींग्ज वॉर वरून मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले होर्डींग्ज लागले होते. आता सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग्ज मुख्यालयाजवळ झळकत आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हे होर्डिंग लागले आहे.
“महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री… एकच दादा, एकच वादा, अजित दादा…” अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर झळकतो आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांचे काही पोस्टर्स मुंबईत झळकले होते. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. या घडामोडीपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतरच जयंत पाटील यांचे होर्डिग्ज झळकायला लागले आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले तर मुख्यमंत्री कोण असेल, हे शरद पवारच ठरवतील व त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल, असे वक्तव्य केले होते.