नवी दिल्ली : अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसं काय देऊ शकते? बहुमत आहे की नाही हे न बघता राज्यापाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? असे प्रश्न आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी (Hearing on Political Crisis in Maharashtra ) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान उपस्थित केले. राज्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्यावर आजपासून सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणीही सिब्बल यांनी सुनावणी दरम्यान केली.
सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विधासभा अध्यक्षांची निवड देखील चुकीची आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी आहे. घटनेची १० वी अनुसूची आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचे अर्थ लावणे आवश्यक आहे. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? याला पक्षातील फूट म्हणता येईल का? असा प्रश्न सिब्बल यांनी केला.
लोकशाही मार्गाने आलेले सरकार पाडण्यात आले. राज्यपालांनी त्यांना शपथही दिली. राज्यापालांचे अधिकार काय? अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसे काय देऊ शकते? असा प्रश्नही उपस्थित करताना आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली आहे.
संविधानाचे रक्षण करणे, हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे. हे दुर्देवी आहे. बहुमत आहे की नाही, हे न बघताच राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पक्षांतील बंडखोरीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे, असा युक्तीवादही त्यांनी केला. बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वी हे सर्व घडत होते. यासंदर्भात पक्षाची कोणतीच बैठक झाली नव्हती. असंवैधानिक गोष्टी थांबल्या नाहीत, तर भविष्यात अनेक प्रकरणे पुढे येतील, असेही ते म्हणाले.