मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी सायंकाळी मुंबईत होणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागलेले (Shiv Sena National Executive meeting )आहे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख पद स्विकारणार काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय ठाकरे गटातील आमदार व खासदारांच्या बाबतीत पक्ष काय भूमिका घेणार, यावर देखील बैठकीत खल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरील एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरतोय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा आयोध्या दौरा पुढच्याच आठवड्यात नियोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे. आयोध्या दौऱ्यावरून आल्यानंतर तेथील महंतांनी दिलेला धनुष्यबाण राज्यभर फिरवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आजच्या कार्यकारिणी बैठकीत कामकाज प्रस्ताव सादर होतील. मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्याता व्यक्त होत आहे. पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या एबी फॅार्मवर कुणाच्या सह्या असतील, याचाही निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचे ठाकरे गटातील आमदार व खासदारांबाबत बैठकीत भूमिका ठरण्याची शक्यता आहे.