ठाकरे गटातील आमदार, खासदारांच्या खरेदीसाठी रेट कार्ड, संजय राऊतांचा दावा

0

मुंबईः शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार-खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांची खरेदी सुरु असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) केला आहे. खासदार राऊत यांनी यासंदर्भात एक रेट कार्ड जाहीर केले असून खासदार, आमदार, शाखाप्रमुख या पदांवरील व्यक्तींसाठी वेगवेगळे दर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील दोन दिवसांपासून खासदार राऊत यांनी शिंदे गट व भाजपवर आरोप सुरु केले आहेत त्यात राऊत यांनी दोन हजार कोटींच्या ‘पॅकेज’चा दावा केला आहे. राऊत म्हणाले की, दोन हजार कोटींचा आरोप करताना याच्या परिणामांची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवले असून मागील ५ महिन्यांत २ हजार कोटींचे पॅकेज वापरण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला.
खासदार राऊत म्हणाले की, आमदार-खासदार-पदाधिकाऱ्यांच्या खरेदीसाठी किती रुपये दिले जात होते, याचे रेटकार्ड तयार करण्यात आलेय. नगरसेवकासाठी २ कोटी, आमदारासाठी ५० कोटी, खासदार ७५ कोटी, शाखाप्रमुखासाठी ५० लाख असे हे रेटकार्ड असून त्यासाठी एजंटदेखील नियुक्त केले आहेत. हे एजंट लोकांना तोडण्यासाठी कमिशनवर काम करत आहेत. हे असे देशात पहिल्यांदा होत असल्याचे ते म्हणाले. कार्यालयांचा ताबा घेतला तरी खवळून उठलेल्या लाखो शिवसैनिकांचा ताबा कसा घ्याल? त्यांना कसे शांत करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना संपावी यासाठी दिल्लीश्वराने ६० वर्षांपासून प्रयत्न केले. ते आम्ही हाणून पाडले. आता काही लोकांना त्यात यश आले असले, तरी महाराष्ट्रातील जनता याविरोधात पेटून उठली आहे, असा दावाही त्यांनी केलाय.