१२ आमदारांच्या नियुक्तीला मंजुरी का नाही? कोश्यारींनी अखेर सोडलं मौन!

0

मुंबई : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेरपर्यंत महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली नाही. त्यामागील कारणही पुढे आले नाही. मात्र, आता राज्यपालपदाची सूत्रे सोडल्यावर कोश्यारींनी त्यावरील मौन सोडलं आहे. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेल्या पत्रातील भाषा कारणीभूत ठरल्याचा गौप्यस्फोट आता कोश्यारींनी केला आहे. (Former Governor Bhagat Singh Koshyari on Uddhav Thackeray) कोश्यारी नमूद करतात की, त्या पत्रात राज्यपालांना एकप्रकारे धमकी देण्यात आली, कायदे सांगण्यात आले, १५ दिवसात मंजूरी देण्यास सांगण्यात आले. असल्या प्रकारचे पत्र पाठविण्यात आले. खरे तर तसे पत्र पाठवले नसते तर मी दुसऱ्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही मला इतक्या दिवसांत मंजूर करून पाठवा, असे मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो का, संविधान असे कुठे लिहिले आहे, असे प्रश्नही कोश्यारी यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना उपस्थित केले आहेत.
कोश्यारी म्हणाले की, माझ्याकडे त्यांची शिष्टमंडळे येत राहिली. मी त्यांना पत्र दाखवत होतो. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. असे पत्र मला पाठवले गेले नसते तर मी दुसऱ्याच दिवशी मंजुरी देणार होतो, असे कोश्यारी म्हणाले. कोश्यारी म्हणाले, माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. पण, त्यांचे सल्लागार कोण होते? उद्धव ठाकरे हे शकुनी मामाच्या जाळ्यात अडकल्याचे त्यांचे आमदारच येऊन आम्हाला सांगायचे.
उद्धव ठाकरे संत माणूस
उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते राजकारणात अडकले गेले, असा उल्लेख करून कोश्यारी म्हणाले, माणूस जर सरळमार्गी, सज्जन नसता, राजकारणी असता, शरद पवारांसारख्या ट्रिक माहिती असत्या, तर त्यांनी असे लिहिले असते का? चार ओळीत लिहून पाठवले असते, तर सही करणे मला भाग पडले असते, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा