
रविवारी अंत्यसंस्कार
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे 8 वे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शनिवार दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 6.40 वा. पुणे येथील सह्यांद्री हॉस्पिटल येथे दु:खद निधन झाले. ते ऑक्टोबर महिन्यापासून आजारी होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती स्थिरावली होती, पण शुक्रवारी अचानकपणे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 16 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे 8 वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे ते विभागप्रमुख होते. 27 ऑगस्ट, 1966 रोजी डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांचा जन्म झाला. अमरावती जिल्ह्रातील बहिरम करजगांव हे त्यांचे मूळ गाव.
रविवार दि. 29 रोजी अंत्यविधी
स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांचे पार्थिव पुणे येथून अमरावतीला आणण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. 29 रोजी सकाळी 10.00 वाजता हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिक्षण क्षेत्राची मोठी हानी
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून शोकसंवेदना
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दु:खद निधनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दु:खद निधनाप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयांमधील प्राचार्य, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.