अन् मुनगंटीवार म्हणाले,“उद्धवजी, पुन्हा एकदा शांतपणानं विचार करा..”

0

मुंबई : भाजप आणि ठाकरे गटातील कटुता सर्वविदित आहे. एकमेकांवर वार आणि पलटवार करण्याची संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. मात्र, याही परिस्थितीत घडणाऱ्या काही घटना राजकीय वर्तुळात उत्सूकता निर्माण करीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा विधान भवनातील एकत्र प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरला असतानाच विधान परिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दीक कोटी आणि मुनगंटीवार यांनी ठाकरेंना दिलेल्या त्या सल्ल्याने (Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray) पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच चर्चेला सुरुवात झाली आहे. हे दोन्ही प्रसंग योगायोग की भविष्यातील घटनांचे संकेत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मागील सरकारने राबविलेल्या वृक्षारोपण योजनेचा विषय विधान परिषदेत निघाला होता. या मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी याबद्धल सडेतोड स्पष्टीकरणही दिले. मुनगंटीवार म्हणाले, “या मोहिमेची २०१६ मध्ये सुरुवात केली, त्यावेळी राज्याचे सर्व प्रमुख नेते तेथे उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील झाडे लावण्यासाठी गेले होते.” मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर बोलताना ठाकरे यांनी “तुम्ही लावलेल्या झाडांना फळं आलीच नाहीत” अशी शाब्दिक कोटी केली. उद्धव ठाकरेंच्या या शाब्दिक कोटीला नंतर मुनगंटीवार यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरले. मुनगंटीवार म्हणाले, “झाडाला फळं येतील असs आम्ही तुम्हाला वारंवार भेटून सांगत होतो. पण तुम्हीच झाडाशी नाते तोडले. त्याला आम्ही काय करणार? मी व्यक्तिगत येऊन तुम्हाला भेटत होतो. कोणत्या झाडाला कोणते खत दिले पाहिजे, हे सांगत होतो. पण तुम्ही झाडांना दुसरेच खत टाकले, मग त्याला फळं कशी लागणार?” त्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शाब्दिक कोटी करीत “तुम्ही मला खताबद्दल सांगत होतात की निरमा पावडरबद्दल?” असा प्रश्न केला. त्यावर मुनगंटीवार यांनी “ते खतंच होत, फक्त निरमा पाकिटामध्ये आणले होते. पण तुमचा गैरसमज झाला. अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांतपणे विचार करा” असा सल्लाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा