नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या प्रचारसभेतून काटोलला परत येताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी दगडफेक केली. या दगडफेकीत देशमुखांच्या डोक्याला इजा झाली. रक्ताने त्यांचा दुपट्टा माखलेला दिसून आला. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या हल्ल्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. आपल्या मुलाला जिंकून आणण्यासाठी अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतः वर हा हल्ला घडवून आणला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
सलील देशमुख हे अनिल देशमुखांचे थोरले चिरंजीव. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काटोल मतदारसंघातून ५ टर्म आमदार राहिलेले अनिल देशमुख यांनी सलीलला विधानसभेची उमेदवारी बहाल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वतः सलील यांनीही ही उमेदवारी मिळविण्यासाठी घरात बराच ‘संघर्ष’ केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव सलील देशमुखांना काटोलची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाला घ्यावा
लागला. दुसरीकडे भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवार रांगेत असताना, त्यातील अविनाश ठाकरे यांच्यासारख्या योग्य व सक्षम उमेदवारांना डावलून शेवटच्या क्षणी चरणसिंग ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली. चरणसिंग ठाकूर दोनदा काटोल-नरखेड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढले व हरले आहेत. त्यांची ३० वर्षांची राजकीय कारकिर्दी, मतदारसंघातील जनतेशी असलेला संवाद बघता भाजपने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल देशमुख यांनी फार कमी मतांनी चरणसिंग ठाकूर यांचा पराभव केला होता. २०१९मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाची लॉटरी लागली. मात्र १०० कोटींच्या लाच प्रकरणात त्यांना जवळपास १२ महिने तुरुंगात राहावे लागले. शिवाय प्रतिमा मलीन झाली ती वेगळीच. अनिल देशमुखांच्या प्रतापामुळे मतदारसंघात मतदारांचा हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सलील देशमुखांचा चेहरा समोर आणला. मात्र सलील देशमुख यांचा कुठलाही संपर्क नसल्याने मतदार त्यांना नवखा उमेदवार म्हणून बघत होते. एकीकडे चरणसिंग ठाकरे यांची बाजू भक्कम तर सलील यांना जनतेकडून कमी समर्थन मिळत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत होते. त्यामुळे मुलाचा होणारा पराभव विजयाच्या दिशेने नेण्याच्या उद्देशाने देशमुख यांनी हल्ल्याचा डाव रचल्याचा संशय राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
जर राजकीय विश्लेषकांच्या संशय खरा ठरला, तर पावसात भिजलेला ‘तो” खरा, मात्र रक्तात माखलेला ‘हा’ खोटा, असेच म्हणावे लागेल. त्यामागचे कारणही तसेच आहे. २०१९ साली राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थिती फार वाईट होती. त्यामुळे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले शरद पवार योग्य संधीची वाट बघतच होते. अशात सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडे छत्री असतानाही शरद पवारांनी छत्रीचा वापर टाळला. मात्र शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेची संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला होता. त्यावेळी छत्री असूनही पवारांनी पावसात भिजून राजकीय स्टंट केल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. आणि आता कोटोलमध्ये अनिल देशमुखांवरील झालेला हल्ला त्यांचाच राजकीय स्टंट असल्याचा आरोप भाजप नेते करत आहे. स्वतःच्या मुलाचा होणारा पराभव टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी पवारांची नक्कल केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पावसात भिजलेला ‘तो” खरा, मात्र रक्तात माखलेला ‘हा’ खोटा, असेच म्हणावे लागेल.
हल्ल्याची घटना घडणे हा निव्वळ स्टंट
नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात निवडणूक होऊ घातली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना घडणे हा निव्वळ स्टंट असल्याचा आरोप भाजपाचे नेते अविनाश ठाकरे यांनी केला आहे.
भाजपा उमेदवारांसमोर, निवडणूक लढविणाऱ्या आपल्या मुलाचा टिकाव लागणार नाही, याची कल्पना आल्याने लोकांची सहानुभूती मिळवण्याचा तद्दन फालतू असा एक प्रयत्न म्हणजे अनिल देशमुख यांनी स्वतःच प्लान केलेला हा हल्ला असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला आहे. एकूणच हा हल्ला, त्यातील छायाचित्रात दिसत असलेल्या दगडांचा आकार, गाडीच्या नुकसानीची वस्तुस्थिती, अनिल देशमुख यांना झालेली दुखापत….सारेच संशयास्पद असल्याचेही अविनाश ठाकरे यांनी म्हटले आहे.