चक्क 7 ट्रक बुडाले

0

नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्राच्या राखेच्या बंधाऱ्यातील राखेपासून तयार केलेला उतार खचल्याने सुमारे 7 ट्रक 30 फूट खोल पाण्यात बुडाल्याची घटना घडली.

 

यासंदर्भातील माहितीनुसार या राख बंधाऱ्यातून दिवसरात्र राखेची उचल सुरु आहे. या राख बंधाऱ्यात टिप्पर उतरण्यासाठी राखेची रॅम तयार केली आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री उशिरापर्यंत 8 ते 10 टिप्पर राख उचलण्यासाठी उतरले होते. त्याचवेळी रॅम खचल्याने राख बंधाऱ्यात उतरलेले सुमारे 7 ट्रक 30 फूट पाण्यात बुडाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सर्व ड्रायव्हर व क्लिनर सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच महानिर्मिती प्रशासनाचे अधिकारी, सुरक्षा अधिकारी, राख बंधारा ठेकेदार व टिप्पर मालक घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार 660 सुपर क्रिटिकल पाँवर प्लांटमधून अचानक पाणी सोडण्यात आल्याने ही दुर्घटना घडली आहे. महानिर्मिती प्रशासनाने किंवा सिव्हिल विभागातर्फे कोणतीही काळजी न घेता राख बंधाऱ्यात पाणी सोडल्याने हे ट्रक बुडाले. नेहमी सिव्हिल विभागाचा निष्काळजीपणा व भ्रष्टाचार यामुळे मागील 2 ते 3 वर्षापासून हा राख बंधारा फुटत आहे. सध्या साचलेले पाणी बंधाऱ्याच्या आतील मोकळ्या जागेत नाली करुन काढण्यात येत असून बुडालेले ट्रक पाण्याची पातळी कमी झाल्यावरच बाहेर काढण्यात येईल अशी मौखिक माहिती महानिर्मितीने दिली.