पंढरपूर- आषाढी एकादशीच्या सोहळ्याची पंढरपुरात लगबग जोरात आहे. आत्तापासूनच भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून शहरात 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गर्दीवर, आपातकालीन स्थितीवर, आता करडी नजर असणार आहे. कुठेही गर्दीत भाविकांच्या जीवितास धोका होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 120 सीसीटीव्ही कॅमेराचे कंट्रोलिंग पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून होत आहे. चंद्रभागा वाळवंट, नगर प्रदक्षिणा , मंदिर परिसर ,शहरातील मुख्य रस्ते ,चौक अशा सर्वच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पाच कोटी रुपये खर्चून लावण्यात आले आहेत. यंदाच्या वारीत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कॅमेऱ्याची नजर संपूर्ण वारीवर आणि भाविकांच्या गर्दीवर असणार आहे.