खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा – खा. अशोक नेते यांचे आवाहन

0

भव्यदिव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळा
– 8 आत्मसमर्पित नक्षलींसह 127 जोडपी विवाहबद्ध
गडचिरोली, 26 मार्च
दोन कुटुंबांना जोडणारा हा संस्कार प्रचंड महागडा झाला आहे. घर विकून, शेती विकून आणि कर्जबाजारी होऊन लग्न केले जाते आणि ते फेडणे झाले नाही, सावकार – बँकेचा ससेमीरा लागला की आत्महत्येचा पर्याय निवडला जातो. यात तुमच्या कुटुंबाचाच घात होतो. म्हणून सामूहिक विवाह सोहळे हे उत्तम असून, विवाह संस्कार सामूहिकतेत पार पडले की त्याला सामाजिक, कौटुंबिक एकतेचा मान प्राप्त होतो, असे मत गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी आज येथे केले.

मैत्री परिवार संस्था, गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी च्या वतीने शनिवारी चंद्रपूर रोड येथील अभिनव लॉन मध्ये 127 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा धडाक्यात पार पडला. या भव्यदिव्य सोहळ्यात 8 आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश होता. या जोडप्यांना नवदाम्पत्य जीवनाचा शुभारंभ म्हणून संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी खा. अशोक नेते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पूर्व विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किशन नागदिवे, आरमोरी मतदार क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे, गडचिरोली – चिमूर क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी, गडचिरोली परीक्षेत्राचे उपपोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)
अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रणिल गिलडा,अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक सतीश देशमुख, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा . संजय भेंडे सचिव प्रा . प्रमोद पेंडके व गडचिरोली शाखेचे निरंजन वासेकर, उद्योजक नवनीतसिंह तुली, सुधा मिश्रा, राजकमल, प्रकाश पोरेड्डीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमार चिंता यांनी केले तर संजय भेंडे यांनी जय सेवाचा जयघोष करत सामूहिक विवाह सोहळा वैशिष्ट्य सांगितले. यावेळी पहिल्यांदा सगळ्या जोडप्यांची आरोग्य तपासणी केली. या सोहळ्यात आदिवासी भागातील लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. आमदार कृष्णा गजबे, राजकमल इत्यादी नी नावदाम्पत्याना आशीर्वाद दिले.
संचालन प्रा. माधुरी यावलकर व अशोक माने यांनी केले तर आभार प्रणिल गील्डा यांनी मानले.

आता आपल्या गावात, घरात परिवर्तन करूया – संदीप पाटील
– शुभ भावना व्यक्त करण्याची संधी मिळणे खूप मोठी गोष्ट असून, ते फार अवघड आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ही संधी आम्हाला प्राप्त झाली. आता आपल्या गावाची, जिल्ह्याचे भविष्य कसे बदलता येईल आणि आपल्या घरात, गावात परिवर्तन कसे करता येईल, याचा विचार करून प्रयत्नांना प्रारंभ करण्याचे आवाहन उपपोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी नवदाम्पत्यांना केले.

जागोजागी स्वागत आणि पुष्पवृष्टी
विवाह विधी सुरु होण्यापूर्वी सकाळी ८.३० वाजता विवाह स्थळ ते बाजार चौक फिरून गडचिरोली मुख्य चौरस्ता ते विवाह स्थळ पर्यंत वर- वधू मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक वरातीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. शहरातून वरात निघाली तेव्हा महिलांनी घराबाहेर पडून कैतुकाने वधू- वरांवर पुष्पवृष्टी केली. मुस्लिम भगिनींनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. वरातीत नातेवाईकांसह पोलिसांची पाऊले थिरकली.

जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य
– वधूला डोरले, मंगळसूत्र, वधू-वरांना नवे कपडे, भांडी आदी संसारोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. जोडप्यांच्या आई-वडिलांनहि अहिरपट्टी देण्यात आली.

चार हजारांवर वऱ्हाड्यांनी लावली हजेरी
– विवाह सोहळ्याच्या अनुषंगाने भव्य असा शामियांना उभारण्यात आला होता. त्याच्याच शेजारी वेगवेगळे मंडपही होते. या सोहळ्याला चार हजारांहून अधिक वऱ्हाड्यांनी हजेरी लावली आणि अक्षतांसह आशिर्वाद दिले. १२८ जोडप्यांचे दहा झोनमध्ये विभाजन करण्यात आले होते. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा, आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके व मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नावे असून वधू- वर भोजन कक्षास वीर राणी दुर्गावती असे नाव दिले होते.