काटोडी खाण बाधितांना होणार अवॉर्ड वाटप

0

बावनकुळेंच्या प्रयत्नांना यश : महसूल विभागाचा अहवाल वेकोलिने केला मान्य

सावनेर. तालुक्यातील काटोडी (Katodi in Savner Taluka ) येथे खदान बंद आंदोलनाची दखल घेतल्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (State president of BJP MLA Chandrasekhar Bawankule ) यांच्या पुढाकारामुळे वेस्टर्न कोलफिल्ड्सने (WCL) राज्याच्या महसूल विभागाने दिलेला अहवाल मान्य करण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे ३४३ खाण प्रकल्पग्रस्तांना अवॉर्ड वाटप होणार आहे. यानंतर प्रकल्पग्रस्तांनी खदान बंद आंदोलन मागे घेतले आहे. तथापि, संपूर्ण मागण्या पूर्ण होईस्तोवर साखळी उपोषन सुरू ठेवले जाणार आहे. २४ मार्च पासून वेकोलिची कोटोडी ओपन कास्ट माईनमध्ये अवॉर्ड वितरित करण्यात येत असलेल्या दिरंगाईमुळे कोटोडी, एरनगाव, पटकाखेडी व पंधराखेडी येथील प्रकल्पग्रस्तांनी खदान बंद आंदोलन सुरू केले होते. आंदोलनस्थळी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भेट देत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शनिवारी प्रकल्पग्रस्त आंदोलक, वेकोलि अधिकारी, जिल्हाधिकारी नागपूर यांची बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती आमदार बावनकुळे यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना केली.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल मैत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, वेकोली पूनर्वसन महाव्यवस्थापक मिलिंद देशकर, नागपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक सुनील कुमार, उपमहाव्यवस्थापक प्रकाश कांबळे, कार्मिक संचालक डॉ. संजय कुमार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, भाजपा प्रदेश कृषी आघाडी महामंत्री आनंदराव राऊत, कोटोडी सरपंच बबलू मंडपे, प्रिती नांदुरकर, सुरेंद्र शेंडे, मेजर बाबा टेकाडे आदी उपस्थित होते.

हे झाले निर्णय

-बैठकीत पहिल्या टप्प्यात ३८ प्रलंबित प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे वेकोलिने मान्य केले.
-न्यायाधिकरनात न्यायाधीश नसल्याने अडकलेली ७६ प्रकरणे तातडीने सोडविण्यासाठी न्यायाधिशांची नियुक्ती लवकरच व्हावी यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
-उल्लेखनीय असे की ७६ प्रकल्पग्रस्तांच्या ७६.७७ हेक्टर जमिनीचे ७.८१ कोटी रुपये जमा असल्याची माहिती यावेळी वेकोलि अधिकाऱ्यांनी दिली.
-वेकोलि कडून सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे समुपदेशन केले जाणार आहे. यासाठी दररोज ५ कुटुंबांना बोलविण्यात येणार आहे.
-स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता महाजेनकोने बचत गटांद्वारे बांबू रोपणाची स्किम राबविली होती ती योजना वेकोलिने राबवावी असेही यावेळी ठरले.

पुनर्वसनासाठी ग्रामसभा
कोटोडीसह इतर गावांच्या पुनर्वसनासाठी ग्रामसभा घेण्यात येणार आहे. यात होणाऱ्या ठरावानुसार निर्देशित जागेवर पुनर्वसन करण्याकरिता वेकोलिने तयारी दर्शविली आहे. उर्वरित मागण्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी वेकोलिला १५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा