विशेष लेख : आया सावंत घुमके!

0

श्रीमंत बापाचं बिघडलेलं पोरगं ते. कंटाळा आला त्याला भारतात काबाडकष्ट करून. तसा काही दिवसांपूर्वीच जीवाची दुबई करून आला होता. पण, म्हणून काय झालं श्रीमंत बापाच्या दिवट्या पोराला कंटाळा येऊ नये असा कुठे नियम आहे ? तर झालं असं की, सावंतांच्या ॠषीलाही आला कंटाळा. मग काय, त्यानं एका खाजगी विमान कंपनीला फोन लावला. कंपनी मालक म्हणाला, ६७ लाख रुपये लागतील. ॠषीनं काढले बॅगेतून पैसे अन् फेकून मारले त्या कंपनी मालकाच्या तोंडावर. म्हणाला, मेरे बाप के पास बहोत पैसे है ! लागू दे किती लागतात ते, पण विमान तयार ठेव. मला एका बिझनेस मिटींगला जायचं आहे, बॅंकाॅंकला. हे ऐकून विमान कंपनीचा मालक गालातल्या गालात हसला. बॅंंकाॅक आणि ऑफीस वर्क? हा मेळ काही जमत नाही बुवा, असं म्हणून त्यानं सावंतांच्या ॠषीकडे संशयानं पाहिलं. पण ६७ लाखांचे घबाड खिशात गेल्यावर त्याचा संशय पुरता निमाला. पाठवतो साहेब विमान, असं म्हणत त्यानं दाराशी उभ्या असलेल्यापैकी एक विमान धाडून दिलं साहेबांच्या सेवेत.

इकडे, वाहन बूक झाले म्हटल्यावर ॠषी आणि त्याचे मित्र जाम खूश झाले. त्यांची लगबग सुरू झाली. बॅग भरताना काय घेऊ नि काय नको, असं झालं होतं बिचाऱ्यांना. तिकडे आफीसचं प्रचंड वर्क लोड असणार याची कल्पना असल्यानं बरीच तयारी चालली होती.

चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह कसा ओसंडून वाहत होता. हे बघून ॠषीच्या बायकोला जरासा संशयच आला. तिकडे तानाजीपंतही काहीसे घुश्शातच होते. हे काय चाललंय पोराचं? परवा परवाच तर दुबईवारी झाली होती. मग आता पुन्हा बॅंकाॅंकला कशाला जायचं तुला? असा रांगडा सवाल त्यांनी केला. पण ॠषीची त्याच्या बिझनेस प्रतिची निष्ठा त्याची त्यालाच ठावूक होती. म्हणाला फार महत्त्वाची बिझनेस मिटींग आहे. मिस नाही करता येणार. दोन मित्रांच्या सोबतीने हा कुठली बिझनेस मिटींग करणार, हे ‘अनुभवी’ पिताश्रींना चांगलेच ठावूक होते. पण लाडावलेला ॠषी काही ऐकेना! बॅंकाॅंकला जाऊन बिझनेस मिटींग करण्याच्या ध्येयाने तो पुरता वेडा झाला होता. कुणालाही न जुमानता लेकरू थेट विमानतळाच्या आणि तिथून बॅंकाॅंकच्या दिशेने निघालं. विमान आकाशात झेपावलं अन् सर्वांनी हुर्रे केलं. आता कोणाचा बा आडवा येत नाही, तिकडे जाऊन बिझनेस मिटींग करण्यात, अशा विचाराने सारेच निश्चिंत झाले.

पोराचं विमान बॅंकाॅंकच्या दिशेने उडाल्यावर

इकडे तानाजीपंत कासावीस झाले. एवढा नकार देऊनही पोरगं थायलंडच्या दिशेने रवाना झालाय् म्हटल्यावर त्यांचा इगो दुखावला. कालचं पोरगं आपल्यासारख्या एवढ्या ‘अनुभवी’ राजकीय नेत्याला बिझनेस मिटींगचे कारण सांगून बॅंकाॅंकला जातो हे काही त्यांना पटलं नाही. काहीही करून त्याला परत बोलावले पाहिजे म्हणून त्यांनी आपले सारे राजकीय कौशल्य आणि संबंध पणाला लावायचं ठरवलं. आपण हलवली की यंत्रणा यू हलणार, याची कल्पना होतीच त्यांना. राजकीय ताकद दाखवली, जरासा पैशाचा माज दाखवला की पोलिस आणि शासकीय यंत्रणा कशी शेपूट घालून लाळघोटेपणा करते, हे इतक्या वर्षांच्या अनुभवातून कळले होतेच त्यांना. मग काय, त्यांनी शक्कल लढवली आणि दिली एक तक्रार पोलिस अधिकाऱ्यांना. पोराचं अपहरण झाल्याची. आता एका माजी मंत्र्यांच्या पोराच्या अपहरणापुढे इतर कुठले विषय महत्त्वाचे असतील सांगा पुण्याच्या पोलिसांपुढे? त्यांनी बाकीची सारी कामे बाजूला ठेवून ॠषीची शोधमोहीम सुरू केली. इतकं मोठं पोरगं थायलंडच्या दिशेने निघालं, खास विमान बूक करून निघालं, दोन मित्रांना सोबत घेऊन निघालं, याचा अर्थ पुण्याच्या पोलिसांना कळला नसेल? पण, राजकीय व्यवस्थेपुढे मुजरे घालणाऱ्या निर्लज्ज अधिकाऱ्यांनी सावंतांनी घातलेल्या घोळापुढे मान तुकवण्याची भूमिका घेतली आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा निर्ढावलेल्या तानाजीपंतांच्या बिघडलेल्या पोराच्या न झालेल्या अपहरणाच्या प्रकरणात गुंतली.

सरकार म्हणजे घरची शेती असल्याच्या थाटात तानाजीपंतांनी पोरखेळ करत पुणे पोलिस, नागरी उड्डयन विभागाचा गैरवापर केला. त्याहून वाईट आणि दुर्दैव हे की, या यंत्रणांच्या निलाजऱ्या अधिकाऱ्यांनी तो होऊ दिला.

एखाद्या सामान्य व्यक्तीला परदेशात जायचं असेल किंवा यायचं असेल तर एअरपोर्ट एथॉरिटी आणि इमिग्रेशनच्या परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र पैसा आणि सत्ता असेल तर हे सगळं कसं झटपट होतं हे राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याच्या बाबतीत दिसून आलं. ऋषीराजने बँकॉकला फिरालया जाणं हे त्याच्या पत्नीला आणि वडील तानाजी सावंतांना मान्य नव्हतं. त्यामुळे तानाजी सावंतांनी त्यांची सर्व राजकीय ताकद पणाला लावली आणि त्याचे विमान हवेतूनच फिरवून पुण्याला परत आणलं. मुरलीधर मोहोळ यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचे बँकॉकला निघालेले चार्टड फ्लाइट चेन्नई वरून पुन्हा पुण्याकडे येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला. मोहोळ हे हवाई वाहतूक खात्याचे मंत्री असल्याने शक्य झाले.

या प्रकरणी, समाज माध्यमांवर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया भारतीय समाजमनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. एकीकडे संत तुकाराम महाराजांच्या वंशजाला ३२ लाखांचे कर्ज फेडता आले नाही म्हणून आत्महत्या करावी लागते आणि इकडे एका माजी मंत्र्यांच्या दिवट्या पोराला खाजगी विमान बूक करायला लाखांनी पैसे उधळायला जराशीही लाज वाटत नाही. एकीकडे मस्साजोग हत्या प्रकरणातील एक आरोपी दोन महिने उलटले तरी पोलिसांच्या हाती लागत नाही आणि दुसरीकडे एका अपहरणाच्या एका खोट्या तक्रारीत कारवाई करताना जीवाचे रान करायला निघालेली पोलिस कुमक…सारेच बेताल, बेजबाबदार वागणे चालले आहे. यांना मनाचीही आणि जनाचीही लाज वाटत नाही. यांना जाब विचारला गेला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कस्पटासमान वागवणाऱ्या आणि पैशापुढे लोटांगण घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले पाहिजे.

स्वतः घरच्या कामासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणारे तानाजीपंत आणि पूर्ण कल्पना असतानाही हा गैरवापर होऊ देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर इतकी कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा असले काही करण्याचा विचारही कुणाच्या मनात येऊ नये.

सुनील कुहीकर