बागेश्वर सरकार रायपूरवर तर अंनिस नागपूरवर ठाम !

0

नागपूर :कुठलेही दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. तशाप्रकारे आम्ही अनेक बाबांच्या दाव्यांचा नागपुरात पर्दाफाश केला आहे. कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दावा करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचू नये, याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही तर नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल, अशी रोखठोक भूमिका अंनिसचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी जाहीर केली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्यापोटी ३० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचे पुन्हा आव्हान देत लक्ष वेधले आहे. पण बागेश्वर सरकार महाराजांनी नागपूरमध्ये हे आव्हान न स्वीकारता त्यांच्या रायपूर दरबारात या, आम्ही समाधान करू या शब्दात हे आव्हान स्वीकारलं आहे. तसे न करता त्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत आमचे आव्हान स्वीकारावे, असे प्रा श्‍याम मानव नागपुरात म्हणाले.
धीरेंद्र महाराजांकडे माहिती मिळविण्याच्या विविध यंत्रणा आहेत. त्यामुळे त्यांनी हे आव्हान त्यांच्या दरबारात नाही, तर नागपूर येथे पत्रकार परिषदेत पंचसमितीच्या समोरच स्वीकारावे यावर मानव ठाम आहेत. ९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं.महाराज दावा करतात की, ते भक्तांचे नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रीतसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलं आहे. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरूपात हे आव्हान दिले असल्याने त्यांनी हिंमत दाखवावी, नागपुरात येऊन हे आव्हान स्वीकारले पाहिजे असेही मानव यांनी सांगत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागपुरातील कार्यक्रम आयोजित करणारे आमदार मोहन मते यांनी महाराज रिकामटेकडे नाहीत, आव्हान देणाऱ्यांनीच रायपूरला जावे, आपले समाधान करून घ्यावे, महाराज सध्या 450 बेडेड हॉस्पिटल निर्मितीसाठी व्यस्त आहेत असे सांगत अंनिसला लक्ष्य केले आहे. इतर धर्मीयांवरही बोलण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान दिले.