नागपूर: शिकण्याचा ध्यास व त्यातून नवनवीन प्रयोग करत संशोधन करणारा पडद्यावरील रँचो ग्रामीण भागात असलेल्या कौशल्याची जाणीव करून देणारा म्हणून नावारूपास आला. परभणी जिल्ह्यातील मानवत येथील अशाच एका रँचोने घरच्या घरी 13 हजार रुपयांमधून इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे.. विशेष म्हणजे त्याचे शिक्षण फक्त नववीपर्यंतच झाले आहे.
गोपाळ विटेकर (३१) असे या तरुणाचे नाव आहे. रोज मजुरी करून तो चरितार्थ चालवतो. गोपाळ यूट्यूबवर इलेक्ट्रिक सायकलचे व्हिडिओ बघायचा. त्यातून त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने स्वतःच घरी इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याचा निश्चय केला. स्कूटीप्रमाणे त्याने सायकलचे डिझाइन केले. इलेक्ट्रिक सायकलसाठी लागणारे बॅटरी किट ऑनलाइन मागितले. बरीच मेहनत घेत अखेर गोपाळचे स्वप्न साकार झाले. इलेक्ट्रिक सायकल तयार झाली. पाच ते सहा तासांत ती चार्ज होते. एका युनिटमध्ये तब्बल 30 किलोमीटर चालते. कामावर जाण्यासाठी तो सध्या हीच इलेक्ट्रिक सायकल वापरत आहे. ही सायकल शहरात आकर्षणाचा विषय बनला आहे. यासाठी घरी असणाऱ्या सायकलचे चाक उपयोगात आणले तर इतर आवश्यक साहित्य टाकाऊ असलेल्या सामानातून वापरले गेले. मुख्य खर्च बॅटरी किटसाठी बारा हजार लागला. मोटार, बॅटरी व कंट्रोलर हे बॅटरी किटमध्ये उपलब्ध होते.
ग्रामीण भागामधील युवकांत प्रतिभा खूप आहे. ध्यास असला की कोणतेही कठीण ध्येय साध्य करता येते. त्यासाठी कोणत्याही व्यावहारिक शिक्षणाची बाधा येत नाही. भागामधील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिभा असते हेच गोपाळ विटेकरच्या उदाहरणातून पहायला मिळाले.