बाप रे… रिव्हॉल्वरच्या धाकावर डॉक्टरचे अपहरण तीन लाख देऊन सरवून घेतली सोडवणूक : मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

यवतमाळ:  जिल्ह्यात गुन्हेगारीचा ग्राफ सतत वाढतो आहे. गंभीर स्वरुपाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व्याप्त आहे. पोलिसांचे नियंत्रण सुटल्याने गुन्हेगार मात्र बेदरकारपणे वागत आहेत. अशीच आणखी एक खळबळजणक घटना जिल्ह्यातील वणीत समोर आली आहे. रुग्णालयातील काम आटोपून स्कुटीने मारेगावकडे येणाऱ्या एका डॉक्टरचे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण (Kidnapping of doctor at revolver point ) करण्यात आले. त्यांच्याकडे खंडणीची मागणी (Demand for ransom ) करण्यात आली. डॉक्टरने मित्राकरवी तीन लाख रुपयांची जुळवाजुळव केली. ही रक्क देऊन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करवून घेतली. सोमवारी रात्री मारेगाव ते वणी दरम्यान (Between Maregaon and Vani) हा थरारक घटनाक्रम घडला. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुढे आल्यापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डॉ. प्रोवेश हाजरा (४८) असे अपहरण झालेल्या डॉक्टरचे नाव सांगण्यात येते. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे त्यांचे क्लिनिक आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ओपीडी आटोपून आपल्या स्कुटीने मारेगावकडे परतत होते. मारेगाव – यवतमाळ मार्गावरील करणवाडीलगत असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मागून आलेल्या स्विफ्ट कारने हाजरा यांना ओवरटेक केले. यावेळी कारमध्ये चार आरोपी होते त्यांनंतर कारमधील आरोपींनी त्यांना थांबण्यास बाध्य केले. ते थांबताच कारमधून एक आरोपी खाली उतरला. त्याने डॉ. हाजरा यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून कारमध्ये बसण्यास सांगितले. डॉ. हाजरा यांना कारमध्ये बसविल्यानंतर अपहरणकर्त्यांची कार मारेगावकडे निघाली. कारमधील चारजणांपैकी एकाने डॉक्टरची स्कुटी घेतली होती. नंतर मारेगावजवळ रस्त्याच्या कडेला स्कुटी सोडून देण्यात आली. या अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देत पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यावर डॉक्टरने माझ्याकडे एवढी रक्कम नाही. मात्र, वणी येथील मित्राकडून तीन लाख रूपये घेऊन तुम्हाला देतो, असे अपहरणकर्त्यांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरला घेऊन ही कार वणीतील एका भागात पोहोचली. डॉ. हाजरा यांनी मोबाईलवरून मित्राशी संपर्क साधून तीन लाख रूपये मागितले. मित्राने ही रक्कम तातडीने पोहोचविली. हाजरा यांनी मित्राकडून पैसे घेऊन ते अपहरणकर्त्यांना दिले. सुटका झाल्यानंतर डॉ. हाजरा यांनी घडलेल्या घटनेची तक्रार मारेगाव पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आहे.

 

सोनसाखळी, अंगठीही हिसकावली

पैसे मिळताच अपहरणकर्ते डॉक्टरला घेऊन पुन्हा मारेगावकडे निघाले. वाटेत डॉक्टरच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील अंगठीही काढून घेतली. त्यानंतर वणी-मारेगाव दरम्यान असलेल्या निंबाळा गावाजवळ डॉक्टरला सोडून देऊन अपहरणकर्ते मारेगावच्या दिशेने निघून गेले.