
नागपूर(Nagpur), दि. १० मे :
जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त लोक कल्याण डायग्नोस्टिक, नागपूरतर्फे सिकलसेल व थॅलेसेमियाबाधितांसाठी जनजागरण आणि समुपदेशन कार्यक्रम सेवासदन हायस्कूल, बर्डी येथील सभागृहात उत्साहात पार पडला.
रा. स्व. संघ सेवा विभाग, एनएमओ आणि लोक कल्याण डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान नागपुरातील विविध सेवा वस्त्यांमध्ये नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत सिकलसेल व थॅलेसेमियाचे काही वाहक आणि रुग्ण आढळून आल्याने त्यांचे समुपदेशन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डागा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. संजय देशमुख, डॉ. कृतीश बालपांडे, डॉ. शिल्पा पाटील आणि डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी बाधितांचे वैयक्तिक समुपदेशन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. संजय देशमुख यांनी सिकलसेल आणि थॅलेसेमिया हे आजार नसून अनुवंशिक रक्तविकार असल्याचे सांगत, २०४७ पर्यंत त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रा. स्व. संघाचे सहसेवा प्रमुख संजय जोगळेकर यांनी विविध सेवा वस्त्यांमध्ये आयोजित शिबिरांचे अनुभव कथन केले. तसेच उपस्थितांमधील काही बाधितांनीही आपले अनुभव मांडले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रकल्प समन्वयक विनय आंबुलकर यांनी लोक कल्याण डायग्नोस्टिकच्या कार्याचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन लोक कल्याण डायग्नोस्टिकचे सचिव आनंद मुळे यांनी केले. संजय जोगळेकर, आनंद मुळे आदींची उपस्थिती होती.
















