Home Top News जंगली हत्तीने धारण केले रौद्र रूपउपद्रवी व्हीडिओप्रेमींची चांगलीच तंतरली

जंगली हत्तीने धारण केले रौद्र रूप
उपद्रवी व्हीडिओप्रेमींची चांगलीच तंतरली

0

भंडारा. जंगली हत्तींचा कळप (wild elephants) सध्या भंडारा जिह्यात (Bhandara District) मुक्कामी आहेत. रानटी हत्तींचा व्हीडिओ काढण्याचा मोह काही उपद्रवी तरुणांना आवरला नाही. मात्र, व्हीडिओ काढताना हत्तीच्या जवळ गेलेल्या या तरुणांना एका महाकाय गजराजाने चांगलीच अद्दल घडवली. तरुणांनी पळ काढून कसाबसा स्वतःचा जीव वाचविला (youth managed to save their lives by running away). हा संपूर्ण थरार व्हीडिओत कैद झाला आहे. त्यात हत्तीने धारण केलेले विक्राळ रूप, पळ काढणाऱ्या तरुणांना पळता भूई थोडी झाल्याचे दिसत आहे. ही व्हीडिओ झपाट्याने व्हायरल होतो आहे. तो अनेकांसाठी मनोरंजन करणाराही ठरला आहे. वनविभागाकडून वारंवार सूचना देऊनही अशाप्रकारे हत्तींच्याजवळ जाणे जीवावर बेतू शकते, याची पुरेपूर जाणीव असूनही अतीउत्साही युवक विनाकारण जीवाची जोखीम पत्करत आहेत.
भंडारा वनविभागातअंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील बरडकिन्ही जंगलात गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या रानटी हत्तींनी आज पहाटे लाखनी तालुक्यातील पेंढरी जंगलाकडे त्यांचा मोर्चा वळवला. पेंढरीला जाण्यासाठी या हत्तींना शिवणी गावातील शेतातून जावे लागते. शुक्रवारी पहाटे रानटी हत्तींना शेतात पाहून काही स्थानिक खोडकर तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांचा व्हीडिओ काढण्यास सुरुवात केली. व्हीडिओ बनवत असताना ते धावत असलेल्या हत्तींच्या अगदी जवळ आले आणि एका महाकाय हत्तीने पलटून या तरुणांना पळवून लावले.
हा संपूर्ण थरार व्हीडिओमध्ये दिसत आहे. सेज (स्ट्राइप्स अँड ग्रीन अर्थ) संस्थेला आज सकाळी ७ वाजता हा व्हीडिओ मिळाला. त्यांनी सांगितले की, हा व्हीडिओ स्थानिक लोक वेगाने शेअर करत आहेत, त्यामुळे या हत्तींच्या मार्गावर लोकांची गर्दी जमू शकते. डीसीएफ राहुल गवई, भंडारा वनविभागाचे प्रमुख, सेजचे साग्निक सेनगुप्ता आणि मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी या हत्तींपासून लोकांनी दूर राहावे आणि इतरांनाही थांबवावे, असा इशारा दिला आहे. अशा घटनांमुळे केवळ जीवितहानी होवू शकते. वनविभागाने हत्तींपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.