अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचा शेतकरी एल्गार मोर्चा

0

शिंदे-फडणवीसांना घेरण्याची रणनिती


नागपूर. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे हिवाळी अधिवेशन मुंबईतच झाले. मात्र, येत्या १९ डिसेंबरपासुन नागपूरात (Nagpur) राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of State Legislature) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Govt) घेरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचीही चर्चा आतापासुनच रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दिंडीचे आयोजन केले होते. पण ग्रामपंचायत निवडणुका, आचारसंहिता आणि कमी दिवसात तयारी शक्य नाही म्हणून दिंडी यात्रा होणार नसल्याची माहिती आहे. त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस येत्या १९ डिसेंबरला नागपूरमध्ये शेतकरी एल्गार मोर्चा काढणार आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविमा, वाढती महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त वक्तव्ये या मुद्द्यांवर राष्ट्रवादी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा काढून शिंदे-फडणवीसांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात हा शेतकरी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे.
याबाबत माजी मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी माहिती दिली आहे. राज्यातील जनता नव्या सरकारच्या कामावर नाराज आहे. राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढणार आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात लाखो लोक आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने हा मोर्चा निघणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजही पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.