अकोल्यात गोवरचा शिरकाव
दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह

0


अकोला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात फैलाव झालेल्या गोवरने अकोल्यातही शिरकाव (Measles has also entered Akola) केला आहे. नोव्हेंबर महिन्यांत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह (Two patients reported positive ) आले आहेत. हे दोन्ही रुग्ण महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. हे दोन्ही रुग्ण आता ठणठणीत असून सद्यस्थितीत त्यांना गोवरचे कुठलेही लक्षणे नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात गोवरने शिरकाव केल्याने पालकांनी मुलांची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. गोवरच्या साथीने मुंबईत थैमान घातल्यानंतर राज्यातील इतरही जिल्ह्यांत गोवरचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. विदर्भातील (Vidharbha) बुलडाणा (Buldana) पाठोपाठ आता अकोल्यातही दस्तक दिली आहे. गोवर पॉझिटीव्ह आलेले दोन्ही रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेले अकोला जिल्ह्यातील दोन्ही रुग्णांचे नमुने पंधरा दिवसांपूर्वी चाचणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल अता प्राप्त झाले आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात दोन्ही रुग्णांवर आवश्यक वैद्यकीय उपचार झाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली. जिल्ह्यात अजूनही गोवरचे सुमारे ४९ संदिग्ध रुग्ण असून त्यांचे अहवाल तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. कुठल्याही प्रकारचा ताप हा गोवर असू शकतो, त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ४९ संशयित रुग्ण
महापालिका क्षेत्र – ३५
ग्रामीण क्षेत्र – १४
एकाही रुग्णाचे लसीकरण नाही
गोवर पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्णांची तपासणी केली असता दोन्ही रुग्णांनी गोवरची एकही लस घेतली नसल्याचे आढळून आले. या संदर्भात महापालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
महापालिका क्षेत्रात दोन रुग्णांचे गोवर पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. दोन्ही रुग्णांची तपासणी केली असता, सद्यस्थितीत त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. ताप, अंगावर पुरळ असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर उपचार करा. पालकांनी आपल्या मुलांना गोवर लसीचे दोन्ही डोस द्यावे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी दिली.