नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची पुन्हा नागो गाणारांना पसंती

0

नागपूरः नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पुन्हा एकदा नागो गाणार यांची घोषणा (Nago Ganar to contest Election) करण्यात आली आहे. या घोषणेमुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघात गाणार हे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत. यावेळी त्यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. शिक्षक परिषदेने दुसऱ्या उमेदवारास संधी द्यावी, असेही प्रयत्न भाजपकडून झाले. मात्र, अखेर पुन्हा एकदा गाणार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ( Nagpur Division Teacher Constituency) नामांकन अर्ज दाखल करण्याचा उद्या १२ जानेवारी हा शेवटचा दिवस असून गाणार हे शेवटच्या दिवशीच अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.


या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीने दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे नागो गाणार अशा या लढतीत आता कॉंग्रेस उमेदवार म्हणून कोणाला उतरविणार, याकडे लक्ष लागलेले आहे. आज दुपारनंतर काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करेल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. प्रहारचे बच्चू कडू हे मेस्टा संघटनेसह राज्यातील पाचही मतदारसंघ लढविणार असून नागपुरातून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कडू यांच्याकडून आजच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.