कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( ED Raids on NCP Leader Hasan Mushrif) यांच्या व त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी (ईडी) छापे घातले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. मुश्रीफ यांचे कागलमधील निवासस्थान तसेच पुण्यातील कार्यालयांवर छापे पडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपासाहेब नलवडे कारखान्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ही कारवाई सुरु असून या कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी मुश्रीफ यांच्या कारखान्याला देखील भेट दिली होती.
ईडीकडून मिळालेल्या प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. याशिवाय त्यांच्या काही निकटवर्तीयांवर देखील छापे पडल्याची माहिती आहे. आप्पासाहेब नलवडे कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ही ही कारवाई सुरु आहे. मुश्रीफ यांनी यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर देखील छापा पडल्याची माहिती आहे. मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्येही मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती.