हिंदुत्वाच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे भाजपचे ठाकरेंना आव्हान

0

मुंबई-भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. भाजपने ठाकरेंना विविध मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. ठाकरेंनी औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान भाजप नेते आशीष शेलार यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भाजपवर तिखट शब्दांत टीका केली होती. भाजपचे हिंदुत्व दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला आहे.
आशीष शेलार यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. “महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय… काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? आणि औरंगजेब की सावरकर?” असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. ‘शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर… असले शब्द न वापरता… उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे… यापैकी नेमके काय? कि दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी”, असे शेलार यांनी म्हटले आहे.