पाटणा-केंद्रातील मोदी सरकार व भाजपविरोधात विरोधकांचे ऐक्य साधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आज बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधकांची बैठक होत आहे. (Opposition unity meeting in Patna) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या बैठकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, विद्यमान अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि जम्मू-काश्मीर नेशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, जेएमएमचे हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री नेते एम. के. स्टॅलिन, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, डी. राजा हे प्रमुख नेते सहभागी होत असून यापैकी काही नेते कालच पाटण्याला दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी दाखल झालेले राहुल गांधी आणि मल्लीकार्जून खर्गे यांचे स्वतः नितीशकुमार यांनी विमानतळावर पोहोचून स्वागत केले.
पाटण्यात विरोधी पक्षांची पहिलीच मोठी बैठक असून यामध्ये भाजपविरोधात लढण्याचा रोडमॅप तयार करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी पाटण्याला पोहोचले. राहुल आणि खरगे आधी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
दरम्यान, या बैठकीत एकूण १५ पक्षांचा सहभाग आहे. त्यात जेडीयू, आरजेडी, आम आदमी पार्टी, डीएमके, टीएमसी, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), पीडीपी, नॅशनल काॅन्फरन्स, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), सपा, जेएमएम आणि एनसीपी या पक्षांचा समावेश आहे.
सर्वांना एकत्र लढायचेय-खर्गे
दरम्यान, या बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, सर्वांना एकत्र लढायचे आहे. म्हणूनच आम्ही आलो आहोत. त्यामुळेच ही बैठक होत आहे. छोटे-मोठे मतभेद विसरून पुढे जाऊ, असेही ते म्हणाले. देशातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी आमची बैठक होत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
तेच नवरदेव
दरम्यान, या बैठकीवरून केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी विरोधकांना चिमटा काढला. पाटणाच्या मार्गावर अनेक वरांचा दावा आहे. पण, नवरदेव कोण आहे हे स्पष्टपणे समजले आहे. तेथे कोणतेही दावेदारी नाही, असे राय म्हणाले. त्यांचा इशारा अर्थातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे होता.