पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजारांवर मतांनी पराभव केला. कसबा मतदारसंघ भाजपला बालेकिल्ला मानला जात असून मागील २८ वर्षांपासून भाजपकडे असलेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीने हिसकावून घेतला. अनेक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवून भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या अश्विनी जगताप यांची विजयाकडे वाटचाल सुरु (Pune Bypoll Election Result 2023) आहे. कसबा मतदारसंघात धंगेकर यांनी सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली होती.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघात तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसबा मतदारसंघात भाजपबद्धल नाराजीची चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याच्या कारणापायी हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी नाराजी व्यक्त करीत उमेदवारी जाहीर केली होती. दवे यांना अत्यल्प मते मिळाली असली तरी त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच असे बोलले जात आहे.
मागील २८ वर्षांपासून कसबा मतदारसंघ भाजपकडे होता. यापूर्वी १९९२ च्या निवडणुकीत येथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. तर २००९ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी मनसेकडून लढत दिली होती. गिरीश बापट यांनी त्यावेळी त्यांना ७ हजार मतांनी पराभूत केले होते.
दरम्यान आपण उमेदवार म्हणून कमी पडलो, अशी कबुली देत हेमंत रासने यांनी पराभव मान्य केला आहे.
कसबा बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, काँग्रेसचे धंगेकर विजयी, चिंचवडमध्ये भाजपच्या जगताप आघाडीवर
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा