नागपूर- महायुतीतील भाजप व शिंदे गट शिवसेनेचे मंत्री, आमदार तसेच विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानी नागपुरात येणाऱ्या भाजप आमदारांसह सहयोगी पक्षाच्या आमदारांसाठी दरवर्षी मार्गदर्शन वर्ग भरवला जातो. विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी आमदारांना पंचसूत्री मार्गदर्शन केलं. मंगळवारी भाजप आमदारांचा स्मृती मंदिरात अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. भाजपच्या समर्थनाने सत्तेत असलेले शिंदे गटाचे आमदारांची उपस्थिती असली तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या गटाचे आमदार गैरहजर होते. यामुळे बरीच चर्चा रंगली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आमदार मनीषा कायंदे, श्रीधर गाडगे, विदर्भ प्रांत सह संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रामुख्याने उपस्थित होते.















