Home Top News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

0

…………………………………………………………..

‘सुकून’ मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजन

नागपूर : (१९-१२-२०२३)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘सुकून’ या मानसिक आरोग्य जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम अंतर्गत समुपदेशन करणाऱ्या विविध स्टॉलचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते सोमवार, दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिना खान, डॉ. सुबोध बनसोड उपस्थित होते.

विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील पी. व्ही. नरसिंहराव ग्रंथालय समोर पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीने विविध प्रकारचे १६ स्टॉल्स लावण्यात आले आहे. या स्टॉल्समध्ये भावनात्मक, सुरक्षा, त्याचप्रमाणे आपण काम का टाळतो, संशोधन करताना आपण चुकतो, शिवाय विविध समस्यांना सामोरे जातो, याचे मानसिकदृष्ट्या समाधान स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शनिवारी विद्यापीठ परिसरात सुकून फेरी काढली. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत पथनाट्य देखील आयोजित करण्यात आले. जागृती शुक्ला, अविनाश अरोरा, अभिषेक उरकुडे, पुष्पराज तिवारी, ऋतिका सोनटक्के, कोमल नागूरकर, कल्पक हटकर, महेश उमाटे, जयंती जोशी व जीजस रंगारी या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आंतर महाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले‌. यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्टाॅल्स मध्ये या पोस्टरचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांकडून पोस्टरचे मूल्यांकन करीत त्याद्वारे क्रमांक दिला जाणार आहे. मंगळवार दिनांक २९ डिसेंबर रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला विभागातील शिक्षक प्रा. अंजन माहेश्वरी, डॉ. विवेक बांबल, प्राजक्ता जोशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती अध्यक्ष तनया अरकाटकर, अभिषेक उरकुडे, नरेंद्र सिंग, ए.पी. अमन, जीजस रंगारी, धनिशा गडे, जागृती शुक्ला, मुकेश तितरे, भक्ती ठाकरानी, लिसा पाटील, खुशी सनक, स्मिता मोहितकर आदी विद्यार्थी प्रयत्न करीत आहे.

रविवारी सायकल रॅली
सुकून या मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांतर्गत रविवार, दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन येथील चिटणवीस सेंटर येथून सायकल रॅलीस सुरुवात होणार आहे. विद्यापीठ परिसरात येत परत चिटणवीस सेंटर येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात येईल