रेशीमबाग भेटीला अजितदादांची ना!

0

नागपूर NAGPUR : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात दाखल होणारे भाजपचे आमदार व मित्रपक्ष हमखास रेशीमबाग परिसरातील RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीभवन परिसराला भेट देतात. तेथे ते आद्य सरसंघचालक डॉ. हेगडेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना अभिवादन करुन संघ कार्याची माहिती घेतात. मात्र, यंदा भाजपच्या वतीने निमंत्रण देऊनही मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने रेशीमबागची भेट टाळली. अजित पवार गटाने ही भेट का टाळली, यावर भाजपसह अजित पवार गटाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अजित पवार गट विचारधारेचे अंतर राखूनच महायुतीत सामील झाला असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. (NCP MLA Skips RSS Smriti Bhawan Visit)

२०१४ राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप- सेना युतीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले. अधिवेशन काळात सत्ताधाऱ्यांनी रेशीमबागला भेट देण्याची परंपरा खऱ्या अर्थाने तेव्हापासून सुरु झाली. यावर्षीची भाजपच्या वतीने आशीष शेलार यांनी महायुतीतील शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशा सर्व आमदारांना रेशीमबाग भेटीचे निमंत्रण दिले होते. भाजपच्या आमदारांसह शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांनी रेशीमबाग भेटीचे निमंत्रण सहर्ष स्वीकारले व प्रत्यक्ष मंगळवारी रेशीमबागेत हजेरीही लावली. मात्र, महायुतीत अलिकडेच दाखल झालेल्या राष्ट्रवादीने यावेळी वैचारिक अंतर राखण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रेशीमबागला जाणार नाहीत, हे कालच स्पष्ट झाले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांनी रेशीमबागपासून अंतर राखले. यासंदर्भात भाजप किंवा राष्ट्रवादी अशा कोणत्याही पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आमचे वैचारिक मतभेद आहेतच व ते भाजपला कालच कळविण्यात आले आहे, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे.