पुणे- भाजप आणि शिंदे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरेंपुढे पुन्हा युतीत समाविष्ट होण्याचा प्रस्ताव (BJP`s Friendship Proposal for Uddhav Thackeray) ठेवला आहे. मौर्य हे सध्या भाजपच्या महाजनसंपर्क अभियानासाठी महाराष्ट्रात आहेत. मौर्य म्हणाले की, उद्धव ठाकरे ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे पूत्र आहेत. त्यांच्या मनातील विचार त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडावे. भाजपची कवाडे नेहमीच खुली असतात. पण, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पुढाकार घेण्याची गरज असून भाजप प्रस्ताव ठेवणार नसल्याचे मौर्य म्हणाले.
मौर्य यांच्या या प्रस्तावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. मौर्य यांनी पुढे म्हटले आहे की, “या प्रकरणी भाजपने नाही तर त्यांनी चूक केली आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
यावेळी बोलताना मौर्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान केले. चार खासदार असलेला पक्ष पंतप्रधानपदाची स्वप्न बघत असून जे ५० खासदार निवडून आणू शकत नाही, ते मोदींना रोखण्यासाठी एकत्र येत असल्याची टीकाही मौर्य यांनी केली.