भाजपच्या रणजित पाटलांना अवैध मतांचा फटका, दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरुच

0

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे कायम (MVA Candidate Dhiraj Lingade) आघाडी घेऊन असून दुसऱ्या पसंतीची मोजणी अद्यापही सुरुच असल्याने निकालास विलंब होत आहे. यात लिंगाडे यांचा विजय निश्चित मानला जात असून भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील याना अवैध मतांचा मोठा फटका बसल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत तब्बल ८ हजार ३८७ मते अवैध ठरली असून त्यात बहुतांश मतपत्रिकांमध्ये भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील (BJP Candidate Ranjeet Patil) यांच्‍या नावासमोर फक्‍त २ हा अंक लिहिला असल्याचे आढळून आल्याने पहिल्या पसंतीच्या मतांअभावी त्या अवैध ठरल्या आहेत. मतदानाचा हा एकसारख्या पॅटर्नमागील गूढ उकलण्याचे प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून सुरु आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या तुलनेत अमरावती पदवीधरची निवडणूक सोपी राहील, असे भाजपच्या नेत्यांचे आडाखे होते. मात्र, अवैध मतांचा फटका रणजित पाटील यांना बसला. डॉ. पाटील यांच्या प्रतिनिधींकडून 8 हजार 735 अवैध मतांच्या पुनर्तपासणीची मागणी करण्यात आल्यावर डॉ. पाटील यांची 348 वैध ठरलीत तर लिंगाडे यांच्या वैध मतांमध्येही 177 ने वाढ झाली. लिंगाडे यांना 43 हजार 632 मते तर डॉ. रणजीत पाटील यांना ४१२६० मते मिळाली होती. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 47 हजार 101 चा कोटा पूर्ण करावा लागतो. धिरज लिंगाडे यांना हा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 हजार 584 मते आवश्यक आहेत. तर डॉ रणजित पाटील यांना 5 हजार 930 मते कोटा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु असल्याची माहिती आहे.