पुणे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावाची परीक्षेसाठी (SSC, HSSC Exam New Rules) मंडळाकडून कठोर उपाययोजना होणार आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार असून परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळांमध्ये पूर्णवेळ हजर राहणार असल्याची मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्यावर्षी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ बघायला मिळाला व मोठ्या प्रमाणात कॉपीची प्रकरणे झाल्याचे निदर्शनास आले होते.
कोरोनाच्या कालावधीनंतर गेल्यावर्षी पार पडलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्येच परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. काही केंद्रांवर मुलांना बसण्यासाठी जागा नसल्याने मंडप टाकावा लागला तर काही केंद्रांवर विषय शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते.
औरंगाबादमधील घटना मोठ्या प्रमाणात गाजल्या. त्यामुळे यंदा कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळातर्फे विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मंडळाचे बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत शाळेतच राहणार आहे. या पथकात किमान चार सदस्य असतील. दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमध्ये फेऱ्या मारतील तर दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. पोलिसांनाही आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.