नागपूरः पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या साथीदारास एकाने गोळ्या घालून ठार केल्याची घटना (Murder in Hingna Area) रविवारी रात्री हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. हिंगणा तहसील कार्यालयाजवळ श्रीकृष्णनगरात रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेतील मृताचे नाव अविनाश घुमडे (वय ३५) असे असून तो पंचवटी पार्क हिंगणा येथील रहिवासी होता. आरोपीचे नाव दीपक खट्या असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. रविवारी रात्री दोघेही सोबत असताना मृताने मुख्य आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. त्यातून दोघांमध्ये वाद होऊन दीपकने अविनाशवर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून त्याला ठार केले.
या घटनेत आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आणखी एक घटना
केवळ दुचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादात नागपुरात एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत विजयनगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मीनारायण उर्फ अजय चंदानिया (वय 21 वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून नाव आहे. गेल्या आठ दिवसातील नागपुरातील ही हत्येची तिसरी घटना आहे. विजयनगर परिसरात लक्ष्मीनारायण आणि त्याचा मित्र दुचाकीने जात असताना हा प्रकार घडला. आरोपीचे नाव निष्पन्न व्हायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून याबाबत परिसरात चौकशी सुरु आहे.