पोलिसांना आलेल्या कॉलमुळे खळबळ : आरोपी ताब्यात
नागपूर. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis ) यांच्या नागपुरातील (Nagpur ) घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचा फोन मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला (Police control room ) आला. या फोनकॉलमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. तातडीने संपूर्ण परिसरात तपास करण्यात आल्यांनंतर हा फोनकॉल खोटा किंवा फसवा असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने शोध घेऊन फोन करणाऱ्या आरोपीलाही हुडकून काढण्यात आले. फोन करणारा व्यक्ती हा नागपूरच्या कन्हान भागातील राहणारा आहे. घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याची धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी माहिती त्याने दिली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांसोबत बोलताना या घटनेला दुजोरा दिला. सोबतच परिसरात कोणतीही आक्षेपार्ह साहित्य किंवा घडामोड आढळून आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तुर्त आरोपीची चौकशी सुरू असल्याने त्याच्याबाबत अधिकची माहिती देणे टाळले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला मध्यरात्री दोन वाजता एका व्यक्तीने फोन केला. त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेब बॉम्ब ठेवल्याचे सांगत धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने फडणवीसांच्या घर गाठले. बॉम्ब शोधक पथकाकरवी परिसर पिंजून काढण्यात आला. सोबतच परिसरात पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. थेट गृहमंत्र्यांशीच संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला. फोन कुठून आला याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला. त्यात कन्हान येथून फोन करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर शोध घेऊन फोन करणाऱ्या आरोपीला शोधून काढत त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अकल्पनीय माहिती दिली. त्याच्या घरची लाईट गेली होती. म्हणून त्याने रागात हा फोने केल्याचे पोलिसांना सांगितले. हे एकून पोलिसांनाही धक्का बसला. तो खरे बोलत असल्याबाबत खातरजमा करण्यात आली. त्यात खोडसळपणातून फोन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.