मुंबईः स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून राजकीय वाद सुरु असतानाच आता त्यांचे नातू रणजित सावरकर यांनी उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले. रणजित सावरकर म्हणाले, “तुमच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असेल, पण जोपर्यंत ते कृतीत उतरत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही (Ranjeet Savarkar on Uddhav Thackeray). सावरकरांचा अपमान होताना लढायला येणारेच खरे सावरकरवादी आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असली तरी ते स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकात अत्यंत अक्षेपार्ह, अश्लिल भाषेत सावरकरांवर टीका करणारे लेख लिहीले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले व त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला. मला भेट तर दिली नाहीच, माझ्या पत्राला देखील उत्तर दिले नाही.”
रणजित सावरकर म्हणाले, मुख्यमंत्री असताना ते बदनामीची कारवाई करु शकले असते. शरद पवारांची बदनामी करणाऱ्या अभिनेत्रीला त्यांनी एक महिना जेलमध्ये पाठवले. शरद पवार यांच्यासाठी जो न्याय लागू झाला, तो सावरकरांबद्दल झाला नाही. शरद पवार यांच्याबद्दल फार काही आक्षेपार्ह बोलले गेले नव्हते. पण सावरकरांवर अश्लिल भाषेत टीका होऊन देखील ती त्यांनी मान्य केली कारण काँग्रेस पक्ष त्यांचा सहकारी होता, असा टोलाही रणजित सावरकर यांनी लगावला. बाळासाहेबांना सावरकरांचा खूप आदर होता. काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलन देखील त्यांनी केले होते, याची आठवणही रणजित सावरकर यांनी करून दिली.
काँग्रेसमध्येही सावरकरांचा आदर
काँग्रेसमध्येही अनेक नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर करणारे आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक हे सावरकर स्मारकाचे अध्यक्ष होते. आजही काँग्रेसमध्ये अनेक सावरकर समर्थक आहेत, पण ते आवाज उठवत नाहीत, हे दुदैव असल्याचे रणजित सावरकर म्हणाले.