अवमान प्रकरणात माजी राज्यपाल कोश्यारींचा हायकोर्टाचा दिलासा

0

 

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर करण्यात आला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्याविरुद्ध रान उठवले व कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोश्यारी यांना मोठा दिलासा दिलाय. महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू कोश्यारी यांचा नव्हताच, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court on Former Governor Koshyari) दिलाय. या प्रकरणात माजी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिलाय. या प्रकरणात माजी राज्यपाल कोश्यारी यांचा महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू नव्हताच तर त्यामागे समाजाचे प्रबोधन करण्याचा हेतू होता, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. खंडपीठाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. राज्यपालांचे वक्तव्य इतिहासाचे विश्लेषण करणारे होते. त्यात त्यांचा सामाजिक दृष्टीकोन दिसून येतो. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले आहे. प्रथमदर्शनी माजी राज्यपालांचे वक्तव्य महापुरुषांचा अवमान करणारे नाही. त्यामुळे फौजदारी कायद्यानुसार ते दखल घेण्यास पात्र नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.