नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) ठेवींवर व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ईपीएफओच्या तब्बल सहा कोटी खातेदारांना दिलासा मिळाला (EPFO Hike Interest Rate) आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदारांच्या खात्यात ८.१५ टक्के दराने व्याज जमा होणार आहे. यापूर्वी २०२१-२२ साठी हा व्याजदर ८.१ टक्के इतक्या नीचांकी पातळीवर घसरला होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा सहा कोटी खातेधारकांना फायदा होणार आहे. ईपीएफओ अनेक ठिकाणी पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्यात सरकारने पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर ८.५ वरून ८.१ टक्क्यांवर आणला. तो ४० वर्षांतील सर्वात कमी व्याजदर होता, असे मानले जाते. एंशीच्या दशकात ईपीएफओने ८ टक्के व्याजदर निश्चित केला होता. तेव्हापासून व्याजदर सतत ८.२५% किंवा त्याहून अधिक राहिला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के व्याज मिळत होते. ईपीएफओकडून यंदा व्याज दरवाढ अपेक्षितच होती. कमाईच्या बाबतीत कर्मचारी संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगले होते, असे सांगितले जाते. ईपीएफओचे उत्पन्न वाढले आहे.