भोपाळः नामिबियातून भारत आणलेल्या आणि कुनो राष्ट्रीय अभयारण्यात ठेवण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. साशा असे या मादी चित्त्याचे नाव होते. नामिबियातच तिला किडनीचा आजार झाला होता व तिच्यावर कुनो येथे उपचार सुरु होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्यावर्षी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला नामिबियातून आठ चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. त्यात साशाचाही समावेश होता (cheetah Sasha dies of kidney infection). अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते कुनो येथे आणण्यात आले आहेत.
मध्य प्रदेश वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे एन कॉन्सोटिया यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मादी चित्ता साशाचा मृतदेह सापडला. मात्र तिचा मृत्यू कधी झाला, हे सध्याच सांगता येणार नाही. भोपाळहून वन आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक कुनो येथे पोहोचले आहे. नामिबियात 15 ऑगस्ट 2022 रोजी साशाची रक्त तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये क्रिएटिनिनची पातळी 400 पेक्षा जास्त होती. यावरून साशाला भारतात आणण्यापूर्वी किडनीचा आजार असल्याची पुष्टी होते. 22 जानेवारी रोजी कुनो येथे, डॉक्टरांच्या एका टीमला दैनंदिन निरीक्षण करताना साशा सुस्त असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते.
दरम्यान, अलिकडे दाखल झालेल्या १२ चित्त्यांना सध्यातरी बंदिस्त कुंपणात ठेवले गेले आहे. कालांतराने त्यांनाही मोठ्या परिसरात सोडले जाणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=-TsLIVd7i-M&t=1014s