बॉम्ब तयार, केवळ वात पेटविणाची देरी उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

0

नागपूर. खासदार संजय राऊत यांनी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान भवनात पोहोचेले. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनीही आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वातीही काढल्या आहेत, फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश असल्याचा इशारा त्यांनी दिला. आधी ताबोडतोबीने सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचे आयुष्य बरबाद होणे थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. त्या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. आंदोलने केली आहेत. आता काहीजण म्हणतात की, तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. असे म्हणणाऱ्यांनी लाठ्याकाठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या, जेव्हा ते आमच्यात होते. मात्र, त्याचा अर्थ त्यांनी आता गप्प बसावे असा नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा विवादास्पद भाग केंद्रशासित झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसे मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाला आहे.


पेन ड्राईव्ह देणार


मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आले की पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये ७० च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म दिली आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे. त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे. साधारणतः १८ व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवलं आहे. त्यात जुन्या मराठी पाट्या, प्रशासकीय कामकाजाचे मराठीतील कागदपत्रं आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवलं आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत. परंतु त्या फिल्मच्या अर्ध्या भागात ऑडिओच नाही. पेन ड्राईव्हमधील फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून नव्या पिढ्यातील लोकप्रिय सदस्यांना हा ठराव म्हणजे काय, तो कशासाठी केला जातो आहे, आपण का सीमाभागातील जनतेच्या पाठिशी उभे राहायचे हे कळेल, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.