भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केली तक्रार

0

चंद्रपूरः आपल्या भावाच्या मृत्यूस डॉ. विश्वास झाडे हे जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी चंद्रपूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. अहिर यांचे लहान बंधू हितेंद्र यांचे १२ जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले होते. ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर हितेंद्र यांना अतिशय गंभीर अवस्थेत उपचारासाठी डॉ.झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आता महिना उलटल्यानंतर अहिर यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी डॉ. झाडे यांच्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. झाडे यांची पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली व त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. अहीर यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाला डॉ. झाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. डॉ. झाडे यांनी उपचारात हलगर्जीपणा दाखविला व त्याचा परिणाम म्हणून भावाचा मृत्यू झाला, अशी अहीर यांची तक्रार आहे.

काय म्हणाले डॉ. झाडे?

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. झाडे म्हणाले की, हितेंद्र अहीर यांना अतिशय गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले गेले होते. अवघ्या पाच मिनिटात ते दगावले. यात आपली काहीच चूक नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, पोलिसांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा