पारसेला राजकीय आश्रयाची पुन्हा चर्चा

0

न्यायालयाने दिले आहेत इन कॅमेरा चौकशीचे आदेश

नागपूर. स्वयंघोषित सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसेने (So Called Social Media Analyst Ajit Parse ) एक डॉक्टर आणि ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाची कोट्यवधीने फसवणूक (Fraud of crores ) केल्याचा आरोप आहे. तपासात त्याने पंतप्रधान कार्यालय आणि सीबीआयचे बनावट लेटरहेड तयार केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यापासून तो आजारी असल्याचे दाखवत आहे. उच्च न्यायालयाने त्याची इन कॅमेरा चौकशी करून माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. त्यामुळे ठगबाज पारसे पुन्हा चर्चेत आला आहे. राजकीय आश्रयामुळेच तो आतापर्यंत बचावला. पुढेही अशाच प्रकारे तो अटक टाळत राहील, या चर्चेने जोर धरला आहे. राजकीय क्षेत्रातील त्याचा गॉडफॉदर आहे तरी कोण (Who is the godfather in political field?), यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी परवानगी मिळवून देण्याची फुशारकी मारत पारसे याने डॉ. राजेश मुरकुटे यांची तब्बल ४ कोटी ३६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला कोतवाली पोलिसांकडे असलेला हा तपास पुढे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पारसेवर अनेक आरोप होत असून त्याने अन्य काही जणांनाही गंडविल्याचे समोर येत आहे. पण, पारसे फारच संयमी खेळी खेळतो आहे.
पारसेने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. हा अर्ज फेटाळल्यावर पारसेने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याचे कारण समोर करून पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाही. पोलिस त्याच्या चौकशीसाठी तो दाखल असलेल्या खासगी रुग्णालयातही गेले. मात्र, त्याने सहकार्य केले नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
त्याला केवळ पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यासाठी तो रुग्णालयात भरती झाला आहे. पोलिसांना पारसेची जी काही चौकशी करायची आहे, त्याची एक प्रश्नावली त्यांनी तयार करावी. ती पारसे किंवा त्याच्या वकिलाला द्यावी. या प्रकरणाच्या पुढल्या सुनावणीपूर्वी अर्थात २० फेब्रुवारीपूर्वी पारसेने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. रुग्णालयातील चौकशीच्या या प्रक्रियेची चित्रफीत तयार करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
केवळ पोटाचा त्रास
पारसेची नेमकी वैद्यकीय स्थिती काय, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या सुनावणीदरम्यान दिले होते. त्यानुसार, त्याच्या डॉक्टरांनी उत्तर सादर केले. त्याला पोटाचा किरकोळ त्रास असून तीन ते चार दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात भरती राहण्याची गरज नाही, असे उत्तर डॉक्टरांनी सादर केले आहे.